कोल्हापूर : महादेवी तथा माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी मंगळवारी राधानगरी, गडहिंग्लजमध्ये ‘आत्मक्लेश महामोर्चा’ काढण्यात आला. जैन समाजबांधवांसह राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील नागरिकांचा मोठा सहभाग होता.
शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीची गुजरातच्या वनतारा या पशुसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी व या हत्तीला पुन्हा मठात परत आणण्याच्या मागणीसाठी आज गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील समस्त जैन समाज व सर्वधर्मीयांनी गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयावर आत्मक्लेश महामोर्चा काढत याकडे शासनाचे लक्ष वेधले.
हे आंदोलन मुनिश्री १०८ विदेहसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात करण्यात आले. बेलबाग येथील जडेयसिद्धेश्वर आश्रमाचे महंत सिद्धेश्वर महास्वामी, हत्तरगी कारीमठ येथील स्वामीजींची उपस्थिती होती. शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जनता दलाच्या स्वाती कोरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यानावर, मनसेचे नागेश चौगुले, काँग्रेसचे दिग्विजय कुराडे, भाजपचे राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, सतीश पाटील, संग्राम सावंत, रफिक पटेल सहभागी झाले होते.
राधानगरी मूक मोर्चा
माधुरी हत्ती परत मिळावा या मागणीसाठी राधानगरी येथील जैन समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना निवेदन देण्यात आले. मूक मोर्चात दत्तात्रय निले, राजेंद्र मुधाळे, महेश निले, प्रकाश बोंबाडे, चंद्रकांत वजुळे, सतीश फणसे, सुनील सांगावकर, भरत निले, उदय उपाध्ये, राकेश निले, सुयोग बोंबाडे, महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
दत्तवाडात महिलांच्या डोळ्यांत अश्रू
महादेवी माधुरी हत्तीचा ताबा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे पुन्हा द्यावा, यासाठी शिरूर तालुक्यातील दत्तवाड येथे सर्वधर्मीय, सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. माधुरी परत आणून द्या, असे म्हणणाऱ्या महिलांच्या डोळ्यांत अश्रू होते. आमची ही मागणी शासनापर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्या करत होत्या. सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच रफिक मुल्ला, पंचायत समिती माजी सभापती मिनाज जमादार, गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगुले सहभागी झाले होते.