कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी भर पावसात डोक्यावरील येरलं बाजूला करत शेतात पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करून वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली. शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरी, ठेच्याची चव चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्याचे चित्र राधानगरीच्या शेतावर दिसून आले.
शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी व पीक उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. निमित्त होते मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमाचे! पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त शाहू जयंती पंधरवड्यात कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांत एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले.
पालकमंत्री आबिटकर यांनी अनंत कृष्णा चौगुले यांच्या शेतीच्या बांधावर उतरून शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी-अडचणी, व्यथा जाणून घेत नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोककुमार पिसाळ, दत्ता उगले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे तसेच महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर आबिटकर यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन येथील भात रोपांच्या विविध जातींची पाहणी केली.