कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या वतीने बुधवारी सहा जिल्ह्यंत मोटर सायकल रॅली  काढण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील रॅलीच्या नियोजनासाठी आज खंडपीठ कृती समितीसह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बठक रविवारी पार पडली. सुमारे पाच हजार मोटर सायकली आणि हजारो नागरिकांच्या सहभागाने ही रॅली यशस्वी करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी गेल्या तीस वर्षांंपासून लढा सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली आहेत.मात्र अद्याप शासन आणि न्यायसंस्थेने याची दखल घेतलेली नाही. याच मागणीसाठी १ डिसेंबर पासून पुन्हा वकिलांनी न्याय संकुलाच्या आवारात साखळी उपोषण सुरु केले आहे. तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने  शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलनाचा पुढील टप्पा  म्हणून एक फेब्रुवारी रोजी सहा जिल्ह्यंत मोटरसायकल रॅली काढण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीच्या बठकीमध्ये  घेण्यात आला. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले असून कोल्हापूर शहरात ही रॅली काढण्यासाठी आज खंडपीठ कृती समिती आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बठक पार पडली.

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांचा गेल्या तीस वर्षांपासून हा लढा सुरु आहे. यापूर्वी दोन वेळा मागणी पूर्ण होईल असे वाटत असताना फसवणूक झाली आहे. त्यामुळे यावेळी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गानी आंदोलन सुरु ठेवण्याची गरज व्यक्त केली.

शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनात जनरेटा वाढवण्यासाठी मोटर सायकल रॅलीचे  नियोजन केले असून शहरातील मुख्य मार्गावरून ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन विसर्जति होणार असल्याचे सांगितले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पुण्यातील काही मंडळीमुळे कोल्हापुरातील खंडपीठ रखडले असल्याचा आरोप केला. भाकपचे सतीश कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, महापालिका सभागृह नेता प्रवीण केसरकर, दिलीप देसाई, महादेवराव आडगुळे संदीप देसाई, महेश जाधव, सुभाष ओरा, वसंत मुळीक आदींनी  मनोगते व्यक्त केले.