निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा करोनाचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. ही बाब चिंता वाढवणारी असली, तरी जिल्ह्य़ातील यापूर्वी करोना झालेल्या दोन रुग्णांनी त्यांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.
निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यासाठी गेलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुणाचा करून अहवाल सकारात्मक आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज येथे दिली. हा तरुण दिल्ली येथून १४ मार्च रोजी कोल्हापुरात पोहोचला. त्याची आरोग्य तपासणी करून पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
३९४ जणांची तपासणी
कोल्हापूर, जिल्ह्यत आजअखेर ३९४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी केवळ तीनच पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज सांगितले. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं असतील तर धोका टाळण्यासाठी त्वरित शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिलासादायक घटना
इस्लामपूर येथील पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्या पेठ वडगाव येथील २२ वर्षीय तरुणीला करोनाची पहिली लागण झाली असल्याचे अहवालातून दिसून आले होते. मिरज येथील शासकीय रुग्णालयात संस्थात्मक अलगीकरण केंद्रात तिचे १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. तिचे दोन्ही चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. कोल्हापूर शहरातील भक्तिपूजा नगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह होता. आता दुसऱ्यांदा त्यांची चाचणी केली असता त्यातील पहिला अहवाल नकारात्मक आला आहे. कसबा बावडा या उपनगरातील एका वृद्धेला करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या महिलेवर उपचार करणारी शासकीय तसेच खासगी डॉक्टरांचीही तपासणी करण्यात आली होती. तसेच, जिल्ह्यच्या दक्षिण भागातील आजरा, चंदगड व गडहिंग्लज येथील १२ संशयित लोकांची तपासणी करण्यात आली होती. या सर्वाचे अहवाल नकारात्मक असल्याचे आज सांगण्यात आले.
कोल्हापूर विमानतळ सज्ज
प्रवासी, माल वाहतूक सेवा यासाठी कोल्हापुरातील विमानसेवा बंद असली, तरी आपत्कालीन उड्डाणासाठी कोल्हापूर विमानतळ सज्ज असणार आहे. याची सर्व सज्जता झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत. त्यातून विमानाची प्रवासी तसेच अन्य माल वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. करोना साथीच्या काळात विविध वैद्यकीय उपकरण मागविण्यासाठी अथवा अन्य तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी सूचना मिळल्यास अवघ्या दोन तासांत कोल्हापूर विमानतळ सज्ज आहे. एअर अॅम्बुलन्स, आपत्कालीन सेवा, परवानगी, मालवाहू सेवा, वैद्यकीय सुविधेसह आणि आवश्यक त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सामाजिक अंतर ठेवत उड्डाण केले जाणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी दिली.