कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासंदर्भात घडलेल्या अप्रिय घटनेचा कोल्हापूर, इचलकरंजीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया आघाडीच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. हल्लेखोराची गय न करता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सरन्यायाधीशांच्या आई विमल गवई या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रमास न गेल्याने, त्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप उदय नारकर यांनी केला.

सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो.  मनुवादी प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला केला. तो एक संघाचा कार्यकर्ता आहे. सरन्यायाधीश हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे. ते मोठ्या कष्टातून वकिल झाले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेला एक व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख बनतो आणि अशाप्रकारच्या व्यक्तीवर मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बुट मारत असेल ते हे लोकशाहीला घातक आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

या गोष्टीचा निषेधही करतो. लोकशाही टिकली पाहिजे, सर्वसामान्यांचा आवाज टिकला पाहिजे, अश सर्वांची भूमिका आहे. जातीवादी प्रवृत्तीची लोक मुद्दामून या देशात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. हे मनुवादी प्रवृत्तीची लोक हळूहळू सर्वोच्च न्यायालयातही आपले नियंत्रण असावे, जेणेकरुन येत्या काळात मनुवाद हा देशात परत एकदा आला पाहिजे, असा काहींचा प्रयत्न असून याचा विरोध आम्ही सर्वजण करतो, अशी यावेळी भूमिका मांडण्यात आली.

इचलकरंजीत निदर्शने

इचलकरंजी येथेही महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संबंधित हल्लेखोरावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शंखध्वनी करण्यात आला. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

वकिलांकडून निषेध

इचलकरंजी बार असोसिएशनच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले होते. असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल तोेष्णीवाल यांनी घटनेचा निषेध नोंदविला. ॲड. भरत जोशी, डी. डी. पाटील, वैदही पाटील, शिवराज चुडमुंगे, व्ही. बी. चव्हाण, डी. एम. लटके, एस. एस. कुलकर्णी, अनिल रुईकर, शरद शिंदे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजीत माने, सह सचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंंगारे, महिला प्रतिनिधी दिपाली हणबर, महेश कांबळे, राहुल काटकर, शैलेंद्र रजपुत, लिपीक प्रविण फगरे यांच्यासह बार असोशिएशनचे सदस्य उपस्थित होते.