लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पंचगगा नदी प्रदूषण प्रश्नी उशिरा का होईना पण आज महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या असणारे कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेचे अधिकारीच या बैठकीस उपस्थित होते. नदी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर दीर्घकालीन आणि तात्कालीक उपायोजना करण्याच्या नेहमीप्रमाणे सूचना करून बैठकीची सांगता करण्यात आली.  

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीचे पाणी काळसर दुर्गंधीयुक्त होऊन मासे मृत्युमुखी पडले. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकांना करणे दाखवा नोटीस बजावण्याची नेहमीचीच कारवाई केली.

आणखी वाचा-आमदार पी. एन. पाटील यांच्या रक्षेचे शेतात विसर्जन; काँग्रेस नेतृत्वाकडून सांत्वन

 यानंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली. नदी प्रदूषण प्रश्नी नोटीस बजावलेले कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. दोन्ही महापालिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सहाआयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदुषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, अशासकीय सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार २०१४ मध्ये समिती गठीत करण्यात आली होती.  यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणेचे अधिकारी समितीमध्ये असतात. पंचगंगा नदीचे प्रदुषण होवू देवू नये आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात या प्रगतीचा दर तीन महिन्याला अहवाल सादर केला जातो. या बैठकीत अशा सर्व दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला.जिल्ह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याचे चालू असून कामे संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. प्रदुषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अतिवापर व आरोग्याच्या तक्रारीबाबतही यावेळी आढावा घेतला.

आणखी वाचा-माधवराव बागल पुरस्कार निरंजन टकले यांना जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदेश कृतीत उतरणार का?

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदीत नव्याने कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही, प्रदुषण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे आदेश पुलकुंडवार यांनी दिले. मात्र पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यास दीर्घकालीन उपाय योजना प्रस्तावित आहेत. त्यातील एकही काम चालू झाले नसताना नव्याने प्रदूषण रोखले कसे जाणार, असा प्रश्न बैठकीनंतर उपस्थित झाला.