कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’च होते. त्यांच्या या गौरवाबद्दल इतिहासात अनेक संदर्भ आहेत. मात्र असा कुठलाही अभ्यास न करता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेला हा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे, या शब्दांत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, तर ‘स्वराज्य रक्षक’ होते, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राज्यात सध्या सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्दय़ावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आणखी वाचा – ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, की संभाजी महाराज यांनी त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वातून हिंदू धर्माचेच रक्षण केले आहे. अगदी त्यांनी मृत्यू स्वीकारला परंतु धर्माला अंतर दिले नाही. यातूनच त्यांना इतिहासापासूनच ‘धर्मवीर’ या नावाने ओळख मिळाली आहे. त्यांचे हे अद्वितीय कार्य, त्याग याची जाणीव न ठेवता कुठलाही अभ्यास न करता अचानकपणे कुणीतरी ते आजपासून ‘धर्मवीर’ नाहीत हे विधान करणे भयंकर आहे. असा प्रयत्नही कुणी करू नये. अजित पवार हे अर्धसत्य, दिशाभूल करणारे बोलतात. संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ होतेच, परंतु हे स्वराज्य कुठले होते? तर ते ‘हिंदूवी स्वराज्य’ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या या ‘हिंदूवी स्वराज्या’चे रक्षण करण्यासाठी इतर मावळय़ांप्रमाणेच संभाजी महाराज यांनीदेखील आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या कार्यातूनच त्यांना ‘धर्मवीर’ म्हटले जाऊ लागले आहे, असे संभाजीराजे म्हणाले.