कोल्हापूर : निवडणूक आयोगाने दक्षतापूर्वक काम करावे. त्यामुळे राज्यात एक कोटीपेक्षा अधिक दुबार नावे मतदारयादीतून दूर होतील, असा दावा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
निवडणूक आयोगाच्या कामावरून देशात आणि राज्यात विरोधकांनी आवाज उठवायला सुरू केले असल्याकडे लक्ष वेधले असता सतेज पाटील म्हणाले, मतदारयादीमध्ये दुबार नोंदणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये बारा हजार दुबार मते नोंदण्याचा मुद्दा या आधीच स्पष्ट केला आहे. अशी परिस्थिती राज्यात सर्वत्र आहे.
आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना पक्षांना दुबार नावे सहजगत्या मिळत असतील तर हे काम निवडणूक आयोगाला करण्यास काहीच अडचण नाही. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीतूनच राजकीय पक्ष, पराभूत उमेदवार दुबार नावे शोधून काढत आहेत. त्यामुळे मतदारयादीतील संभ्रम निवडणूक आयोगाने दूर करावा. निवडणूक आयोगाने ठरवले तर ४८ तासांत दुबार नावे मतदारयादीतून कमी होऊ शकतात, असेही पाटील म्हणाले.
राज्यात विखे पाटील- छगन भुजबळ यांच्यातील वादावर बोलताना आमदार पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी या दोघांनाही कामाला लावलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर न घालता विखे पाटील आणि भुजबळ बोलतात हे पटणारे नाही. एकाने एक गट सांभाळावा तर दुसऱ्याने दुसरा गट सांभाळावा आणि दोन्हीकडच्या माणसांनाही आपल्याकडे जोडून ठेवावे, असा यामागचा छुपा डाव सोपा आहे. दोन समाजात भाजप, महायुतीकडून भांडण लावण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
दुबार मत नोंदणीबाबत ते म्हणाले, याबाबत गांभीर्याने काम केले पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या कामकाज पद्धतीमध्ये मोठी तफावत आहे. यामुळेही मतदारयादी निर्दोष होताना दिसत नाही. दुबार नावे मोठ्या प्रमाणात कमी झाली तर निवडणूक आयोगावरील कामाचे ओझे कमी होणार आहे. यंत्रणासुद्धा कमी प्रमाणात वापरावी लागेल. या सर्व गोष्टीचाही फायदा होणार आहे. याचा विचार केला पाहिजे.
कोल्हापूरातील खराब रस्त्यांच्या विरोधात आंदोलने होत असून आता हा मुद्दा कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यापर्यंत गेला आहे. याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक कर राज्याच्या तिजोरीत जातो. पण त्याचा नीट परतावा कोल्हापूरला मिळत नाही. शंभर कोटीचे रस्ते आले पण ते सुद्धा व्यवस्थित वापरले गेलेले नाहीत.
कोल्हापूरातील रस्ते दुरूस्त करण्यासाठी, खड्डे भरण्यासाठी तत्काळ ५० कोटी रुपये शासनाने द्यावेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी खड्डे भरले गेले आहेत, मी हे तपासण्यासाठी एक माणूस सुद्धा द्यावा अन्यथा रस्ते कामाचा पूर्वानुभव काय आहे याची सर्वांना कल्पनाच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.