कोल्हापूर : येथील पंचगंगा नदी घाटावर एका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा, कोल्हापुरात करणी-भानामतीचा अघोरी प्रकार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे.
महिलेच्या अंगातून मांत्रिकाकडून भूत काढण्याच्या निमित्ताने हा अघोरी प्रकार रात्री उशिरा घडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आज घाटावर लिंबू, हळद, उदबत्ती असे पूजा साहित्य विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्याने करणी-भानामतीचा हा प्रकार असल्याची चर्चा होती. पंचगंगा घाटावर अशा प्रकारची घटना घडल्याने संबंधित मांत्रिकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांनी केली आहे.
कोल्हापूर शहरात आजवर अंधश्रद्धेला स्थान मिळाले नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. या भोंदूगिरीला सामान्य नागरिक बळी पडत आहेत. त्यातच पंचगंगा नदी घाटावर एका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार पुढे आल्याने त्याची चर्चा होत आहे.