प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून जप्त केलेल्या वाहनातील सुटे भाग चोरून नेण्याचा प्रकार इचलकरंजी येथे उघडकीस आला. यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार नजरेसमोर आला आहे. तर सुटे भाग चोरून नेल्याने वाहन धारकातून खळबळ आहे.

इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. यंत्रमाग व्यवसाय मोठा असल्याने येथे रोजगारही मोठय़ा प्रमाणात आहे. शहरामध्ये सुत, कापड वाहतूक करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक टेम्पो आहेत. मंगळवारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. ८ टेम्पो पकडण्यात आले होते. गाडीची कागदपत्रे अपुरी असल्याने टेम्पो जप्त करून शहापूर येथील एसटी आगारामध्ये लावण्यात आले होते. गाडी मालकांना  दंड भरण्यासाठी कोल्हापूर कार्यालयाला पाठवण्यात आले होते.

दंड भरून गाडी मालक एसटी आगारामध्ये परत आले असता गाडीतील स्पेअरपार्ट, बॅटरी, स्टेपनी, टेप, फळी इ. साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली.  प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहनमालकांनी एसटी आगारप्रमुख व तेथील रखवालदार यांना जाब विचारला. त्यांच्या कडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने राजू रावळ व इतर वाहनधारकांनी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले. चोरीबाबत त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. दरम्यान आज आरटीओ अधिकारी कॅम्पसाठी आले असता वाहनधारकांनी त्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले. यावर वाहन निरीक्षक जाधव यांनी चोरीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाईल तसेच पोलिसांच्या मार्फत चोरीचा तपास लावला जाईल असे सांगितले.