scorecardresearch

कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने यांचा ताफा रोखल्याने शिवसेनेच्या दोन गटांत सामना

एका कार्यक्रमासाठी खासदार माने जात असताना त्यांना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी ‘शिवसेनेशी गद्दारी का केली’, अशी विचारणा करीत रोखले. यातून ठाकरे-शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याने तणाव निर्माण झाला होता.

Shiv Sena two factions clashed kolhapur
खासदार धैर्यशील माने यांचा ताफा रोखल्याने शिवसेनेच्या दोन गटांत सामना (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्यात बुधवारी सामना रंगला. एका कार्यक्रमासाठी खासदार माने जात असताना त्यांना ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी ‘शिवसेनेशी गद्दारी का केली’, अशी विचारणा करीत रोखले. यातून ठाकरे-शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याने निर्माण झालेला तणाव पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने दूर झाला.

खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथील सभेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र डागले होते. त्यावर माने समर्थक शिवसैनिकांनी राऊत हे इचलकरंजीला जात असताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी, निदर्शने केली होती. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी माने यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली होती. त्यानुसार आज चंदूर (ता. हातकनंगले) येथे खासदार माने जात असताना त्यांचा ताफा अडवला.

हेही वाचा – पुणे: मेहनत घेत असतानाच मल्लाचे निधन

वादावादीमुळे तणाव

शिवसेनेची गद्दारी का केली, सहा महिन्यांसाठी शिवसेनेत येऊन तुम्ही हेरगिरी केली का, अशी विचारणा ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी केली. खासदार माने यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके, गद्दार माने, अशा घोषणा सुरू ठेवल्या. यातून माने समर्थक शिवसैनिक व ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्या बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना पांगवल्याने तणाव निवळला.

हेही वाचा – अंगावर वीज पडून शेतकरी तरुणाचा मृत्यू

सर्व फुटिरांना जाब

खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी जिवाची बाजी केली होती. ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांना तसेच जिल्ह्यात सर्व फुटिरांना जाब विचारला जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 17:43 IST