कोल्हापूर : धैर्यशील माने व सत्यजीत पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीत साखर कारखानदार १०० कोटींचा डाव खेळत आहेत. शेतकरी चळवळ संपविण्यासाठी या दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साखर कारखानदारांनी कटकारस्थान रचले आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. ते बिळाशी( ता. शिराळा )येथील जाहीर सभेत बोलत होते. शेतकरी चळवळ ही कष्टकऱ्यांच्यासाठी उभी केली आहे. कितीही वार झाले तरी मी झेलायला समर्थ आहे, असेही शेट्टी म्हणाले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये यावेळी पंचरंगी सामना होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे.तर त्यांच्या विरोधात महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने , महाविकास आघाडीचे ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील ,शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील आदी प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघांमध्ये साखर कारखानदारांची संख्या अधिक असल्याने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नेतेही अधिक असल्याने निवडणुकीला साखर कारखानदार विरुद्ध ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते असे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी केलेला हा आरोप चर्चेला कारण ठरला आहे.

हेही वाचा…चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत

श्रेय मिळू नये म्हणून

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, निवडणुकीत रंगत वाढत नाही म्हटल्यावर या दोन्ही आघाडीकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू झाला आहे. जेवणावळी सुरू केल्या आहेत. पैशाच्या राशी बाहेर निघत आहेत. प्रत्येक साखर कारखानदारांना यांनी टार्गेट दिले आहे. त्याप्रमाणे ते प्रामाणिक पणे यांच्यासाठी पैसा खर्च करत आहेत. शेतकऱ्यांची बिले देण्यास पैसे नाहीत म्हणून ओरड करणाऱ्या कारखानदारांना निवडणुकीत पैसा कुठून आला? आमच्या हक्काचे पैसे द्यावेत म्हणून मी पद‌यात्रा काढली. आंदोलने केली, महामार्ग रोखला मग सरकार जागे झाले. आमचे १०० रूपये का दिले नाहीत? त्याचे श्रेय मला मिळू नये म्हणून या साखर कारखानदारांनी मुख्यमंत्र्यावर दबाव टाकला.

हेही वाचा…शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी किती लुटणार?

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे निर्णय घेतला. आचारसंहिता संपल्यावर मी यांना सोडणार नाही. शेतकऱ्यांचे पैसे दिल्याशिवाय रस्त्यावर देखील फिरू देणार नाही. काटामारी करणाऱ्या साखर कारखान्याविरोधात विशेष मोहिम उघडलेली आहे. साखर कारखान्यांचे सर्व काटे डिजीटल करून संगणकीय प्रणाली जोडून त्यामध्ये सुसुत्रता आणावी, यासाठी मी वेळोवेळी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या आहेत. तरीही सरकारने अजून मान्यता का दिली नाही? दरवर्षी शेतकऱ्यांच्या उसातून ४५०० कोटींचा काटा हे साखर कारखाने मारतात. शेतकऱ्यांना अजून किती लुटणार आहात ? काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांचा या निवडणुकीत शेतकरी काटा काढतील, असे इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्य संदीप जगताप, रवी मोरे, वसंत पाटील, राम पाटील, मानसिंग पाटील, सुरेश म्हाऊटकर आदी उपस्थित होते.