कोल्हापूर: अभ्यासक्रमा मान्यतेची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी येथील शिक्षण सहसंचालकांसह कार्यालयातील तिघांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हेमंत नाना कठरे (वय ४६ वर्षे, रा.कोल्हापूर. मुळ रा. पाचवड, ता.खटाव), उच्च श्रेणी स्टोनो ग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२,रा. पिरवाडी, ता.करवीर, मूळ रा.महमंदापूर, ता.भुदरगड), कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय ३४ रा.राशिवडे, ता.राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थे अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सुविधा याची तपासणी करून प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी कटरे यांच्यासाठी गुरव याने ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ती जोंग याच्याकडे देण्यास सांगितले. तडजोडी अंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम आज देत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले,अशी माहिती पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांनी दिली.