ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताने पहिल्या काही षटकांत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. मोहम्मद सिराजनं डेव्हिड वॉर्नरला अवघ्या एका धावेवर असताना तंबूत धाडलं.

मोहम्मद सिराजनं टाकलेला चेंडू टोलावण्याच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नर बाद झाला. वॉर्नरनं दुसर्यांदा सिराजाला आपली विकेट दिली. सिराजच्या चेंडूवर रोहित शर्मानं स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेलता. या झेलमुळे रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- भारतीय कसोटी इतिहासात ७ वर्षात पहिल्यांदाज घडली ‘ही’ गोष्ट

मोहम्मद सिराजनं डेव्हिड वॉर्नरला १ धावेंवर माघारी धाडल्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरनं आपल्या पहिल्याच चेंडूवर मार्कस हॅरीसलाही बाद केलं. त्यामुळे अवघ्या १७ धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्मिथ-लाबूशेन या जोडीनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या आहेत.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनने मैदानात उतरताच रचला इतिहास; ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

दरम्यान, भारतीय संघानं ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापग्रस्त जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांना आराम दिला आहे. टी. नटराजन आणि वॉशिंगटन सुंदर यांचं कसोटी पदार्पण झालं आहे. त्याशिवाय मयांक अगरवाल आणि मुंबईकर शार्दुल ठाकूरलाही संधी देण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे ‘अ’ संघाप्रमाणे भासणाऱ्या भारताची ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी लागणार आहे.