देशात करोनामुळे स्थिती चिंताजनक आहे. रोज तीन लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण होत आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. यात काही राज्यांनी लॉकडाऊन लावला आहे. करोनाच्या भीतीने परदेशी खेळाडूही स्पर्धा सोडून जात आहेत. असं असूनही आयपीएल स्पर्धा सुरु असल्याने भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याने नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटर्स आणि अधिकारी बाहेर जे काही होतंय याबाबत अंध होऊ शकत नाही, असा टोलाही मारला.

‘क्रिकेटर्स आणि अधिकारी आपलं जीवन बायो बबलमध्ये व्यतित करु शकत नाही. जे काही बाहेर होत आहे. त्यासाठी ते पूर्णपणे अंध आणि बहिरे होऊ शकत नाहीत. मी फक्त एक कल्पना करू शकतो. तुम्ही आयपीएल खेळत आहात आणि स्टेडियमबाहेरून रुग्णालयात रुग्णवाहिका आवाज करत जात आहे. त्यावेळी टीव्ही कव्हरेज कसं असेल माहिती नाही. तेव्हा मौन पाळणं उचित राहील असं मला वाटतं. एकीकडे लोक करोनामुळे जीव गमवत आहेत आणि दुसरीकडे आपण विजयाचा आनंद लुटत आहोत. मला वाटतं प्रत्येकाने समाजाप्रती थोडा सन्मान राखला पाहीजे.’, असं अभिनव बिंद्रा यानं सांगितलं.

जिंकलंस भावा… ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूने PM Cares निधीला दिले ३७ लाख रुपये

‘समाजाप्रती थोडा तरी दयाळुपणा दाखवला तर आपण एक व्यक्ती आणि एका राष्ट्राला चांगलं करण्यासाठी मदत करू. हे सोपं नाही. करोनाचं संकट कधी संपेल माहिती नाही. करोनामुळे किती लोकांचे जीव जात आहेत. किती संसार उद्ध्वस्त होत आहे. येणारा काळ कठीण आहे’, असंही अभिनव बिंद्रा यांनं पुढे सांगितलं.