बॉलीवूड किंग शाहरुख खानला अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) तिस-यांदा समन्स बजावला आहे. परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याचे त्याने उल्लंघन केल्याचे वृत्त आहे.
शाहरुख खान, जुही चावला आणि तिचा पती जय मेहता हे आयपीएलमधील कोलकाता नाइट राइडर्स संघाचे मालक आहेत. या कंपनीचे काही शेअर्स शाहरुखने परदेशी कंपनीला विकले असून, त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने २००८ साली एका मॉरिशस कंपनीला द कोलकाता नाइट राइडर्स प्रा. लि.चे शेअर्स मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकल्याचे कळते. यासंबंधी शाहरुखला मे महिन्यात नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानुसार त्याला अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिका-यांसमोर उभे राहायचे होते. मात्र, आपण मुंबईत नसल्याचे कारण देत शाहरुखने अधिका-यांची भेट घेणे टाळले. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा समन्स पाठविण्यात आला आहे.