भारतीय बास्केटबॉल महासंघावर (बीएफआय) वर्चस्व गाजवण्यासाठी सुरू असलेला कलगीतुरा न्यायालयाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. के. गोविंद राज आणि पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघटनांमध्ये हा वाद सुरू आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओसी) हा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही अध्यक्षांची बैठक बोलावली, परंतु त्याला के. गोविंद राज यांच्या समितीने न जाणेच पसंत केले. ‘‘जोपर्यंत महाजन न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही,’’ असे ठाम मत के. गोविंद राज यांच्या समितीतील सरचिटणीस चंद्रमुखी शर्मा यांनी मांडले.
‘‘आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटनेने (फिबा) आमच्या संघटनेला मान्यता दिलेली असताना आम्ही महाजन यांच्या समितीशी चर्चा का करायची? पूनम महाजन खासदार आहेत आणि त्यांचे मंत्री सत्तेत आहेत म्हणून आयओसीकडून होत असलेली मध्यस्थी आम्हाला योग्य वाटत नाही,’’ असा सवाल शर्मा यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘‘गोविंद यांच्या नेतृत्वाखाली २७ मार्चला आम्ही बंगळुरू येथे निवडणूक घेतली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाजन यांनी पुण्यात निवडणूक घेऊन पेच निर्माण केला. जे कधी बास्केटबॉलच्या कोर्टवर उतरले नाही, ज्यांनी कधी हा खेळ खेळला नाही, ते सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
या सर्व प्रकारांत खेळाडूंचे नुकसान होत असल्याच्या प्रश्नावर शर्मा म्हणाले, ‘‘आम्ही कधीच कोणत्याही खेळाडूचे नुकसान होऊ दिलेले नाही. महाराष्ट्राच्या खेळाडूंना सुडापायी आम्ही डावलतो, हा अपप्रचार चुकीचा आहे. मुळात पूनम महाजन यांची संघटनाच खेळाडूंची दिशाभूल करत आहेत. १६ वर्षांखालील मुलींच्या निवड चाचणी स्पध्रेकरिता देशातून ८० खेळाडू आले, परंतु त्यात महाराष्ट्राच्या केवळ तीनच मुली होत्या. त्यापैकी दोघांची संघात निवड झाली. मग आमच्यावर होत असलेल्या आरोपात किती तथ्य आहे, हे तुम्हीच तपासा. त्या संघाचे प्रशिक्षक अभय चव्हाण हे महाराष्ट्राचे आहेत. आम्ही खेळाडू आहोत आणि खेळाडूंचे दु:ख आम्हाला चांगले कळते.’’
एनबीएने नवी प्रेरणा
अमेरिकन नॅशनल बास्केटबॉल अर्थात एनबीएमुळे भारतात बास्केटबॉल खेळाला नवीन प्रेरणा मिळाली असल्याचे शर्मा सांगतात. ते म्हणाले, ‘‘हा प्रकल्प एनबीए स्वतंत्ररीत्या शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर चालवत असल्याने संघटनेचा त्यात अधिक हस्तक्षेप नसतो. आम्ही त्यांना केवळ सर्वोत्तम खेळाडू कुठे मिळतील याची माहिती देतो आणि संबंधित शाळांशी संपर्क करून देतो.’’
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
आता चर्चा याचिका मागे घेतल्यानंतरच! भारतीय बास्केटबॉल महासंघाचे सरचिटणीस शर्मा यांचा इशारा
भारतीय बास्केटबॉल महासंघावर (बीएफआय) वर्चस्व गाजवण्यासाठी सुरू असलेला कलगीतुरा न्यायालयाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे.
First published on: 02-08-2015 at 12:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After petition get back then discuss