मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कंत्राटांबाबत कार्यकारिणी समितीच्या आठ सदस्यांनी सचिवांवर आक्षेप नोंदवला होता. याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत त्रिसदस्यीय आढावा समिती नेमण्यात आली आहे.

‘एमसीए’च्या कारभारातील आठ मुद्दय़ांवर आक्षेप घेत आठ सदस्यांनी अध्यक्ष विजय पाटील यांना तातडीची बैठक आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानंतर झालेल्या तातडीच्या बैठकीत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या वेळी सदस्यांनी केलेल्या आठ ठरावांना बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. याचप्रमाणे कंत्राटांचा आढावा घेण्यासाठी अमोल काळे, अजिंक्य नाईक आणि कौशिक गोडबोले यांचा समावेश असलेली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

सफाळ्यातील शिबीर रद्द

मुंबईच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाचे सफाळा येथील सराव शिबीर रद्द करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथे शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये जागतिक दर्जाची इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण व्यवस्था असल्याने सफाळा येथे होणाऱ्या या शिबिराबाबत आठ सदस्यांनी विरोध दर्शवला होता.