भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेटरसिकांना उत्सुकता; मोहम्मद आमिरच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष

जागतिक क्रिकेटमधील सर्वात रंगतदार द्वंद्व पाहायची संधी शनिवारी क्रिकेटरसिकांना लाभणार आहे. आशिया चषक  ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत भारत-पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मात्र बंदीची शिक्षा भोगल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेल्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. पुढील महिन्यात आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकातसुद्धा भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे आशिया चषकातील लढत म्हणजे त्याची रंगीत तालीम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध नेहमीच ज्वलंत असल्यामुळे २२ यार्डाच्या क्रिकेट मैदानावरील लढतीला गेल्या काही वर्षांत वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी पाच वष्रे बंदीची शिक्षा भोगल्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यापासून आमिर पुन्हा राष्ट्रीय संघात सामील झाला आहे. त्यामुळे या गुणी गोलंदाजाची दहशत भारतीय फलंदाजांवर असणार आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने आमिरच्या पुनरागमनाचे स्वागत केले आहे. मात्र स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी शिक्षा झालेल्या खेळाडूविषयी मत प्रकट करण्याचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह अन्य खेळाडूंनी प्रकर्षांने टाळले आहे. कारण भारतात सामना निश्चिती करणाऱ्या खेळाडूंना गांभीर्याने शिक्षा झाली आहे. मात्र भारताविरुद्ध उत्तम कामगिरी करून संघसहकारी आणि क्रिकेटरसिकांच्या मनात स्थान मिळवण्याचे ध्येय आमिरने जोपासले असेल.

गेल्या महिन्याभरात भारत, पाकिस्तान हे दोन्ही संघ पुरेशा प्रमाणात ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळले आहेत. भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकाची दिमाखात तयारी करताना आतापर्यंतच्या ७ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानचा संघसुद्धा पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळून बांगलादेशमध्ये आल्याने ताजातवाना आहे. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा दोन्ही प्रकारच्या विश्वचषक स्पध्रेत भारत पाकिस्तानकडून अद्याप एकदाही हरलेला नाही. परंतु आशिया चषकाच्या व्यासपीठावर शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. आशिया चषक स्पर्धा आतापर्यंत कधीही ट्वेन्टी-२० स्वरूपात झाली नव्हती, हेसुद्धा विसरता कामा नये. बरोब्बर एक वर्षभरापूर्वी अ‍ॅडलेड येथे विश्वचषकाच्या निमित्ताने दोन संघांमध्ये अखेरची लढत झाली होती. तो सामना भारताने ७६ धावांनी जिंकला होता. विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेची चर्चा ऐरणीवर होती. मात्र भारत सरकारने परवानगी न दिल्यामुळे ती बारगळली.

धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने योग्य वेळी सर्व विभागांमध्ये कात टाकली आहे. हार्दिक पंडय़ाच्या उदयामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बाबतींत भारतीय संघ मजबूत झाला आहे. कागदावर जरी भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी पाकिस्तानच्या अनिश्चिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किंबहुना हीच त्यांच्या खेळाची खाासियत आहे. मात्र धोनीच्या पाठदुखीची चिंता अद्याप कायम आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत तो दुखापतीकडे डोळेझाक करून खेळला होता. तो सामना भारताने ४५ धावांनी जिंकला.

भारतीय संघाचे अंतिम ११ खेळाडू निवडताना प्रयोगाला पुरेसा वाव नाही. क्रिकेटच्या लघुप्रकारात विराट कोहलीनंतर रोहित शर्मा हा दुसरा सामना जिंकून देऊ शकणारा नायक भारताला मिळाला आहे. शिखर धवनच्या कामगिरीतील असातत्य कायम आहे. मात्र त्याची बॅट तळपल्यास प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तो वर्चस्व गाजवतो.

पाकिस्तानच्या संघाकडे पाहिल्यास मोहम्मद हाफीझ आणि शार्जील खान ही सलामीची जोडी भारतीय गोलंदाजांवरील दडपण वाढवू शकेल. पाकिस्तान सुपर लीगमध्ये या जोडगोळीने सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. उमर अकमलसारखा गुणवान फलंदाजसुद्धा पाकिस्तान संघात आहे. लाहोर क्वालंडर्सकडून खेळताना त्याने ३५५ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीचा खेळ अधिक उंचावतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फारशी प्रभावी कामगिरी करू न शकलेला कोहली पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी उभारण्यासाठी उत्सुक आहे. भारताकडे मधल्या फळीत युवराज सिंग आणि सुरेश रैनासारखे खेळाडू आहेत. तर पाकिस्तानकडे शोएब मलिक आणि खुर्रम मंझूर आहे.

फिरकी गोलंदाजीत पाकिस्तानला लेग-स्पिनर यासिर शाहची उणीव तीव्रतेने जाणवेल. मात्र आफ्रिदी कामचलाऊ गोलंदाजी करू शकेल. भारताच्या रविचंद्रन अश्विनचे आव्हान पाकिस्तानला आत्मविश्वासाने पेलावे लागेल. पीएसएलमध्ये १३ बळी घेणारा मोहम्मद नवाझ हा डावखुरा फिरकी गोलंदाजीचा पर्याय आफ्रिदीकडे आहे.

वेगवान गोलंदाजीमध्ये मात्र पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा वरचढ आहे. पाकिस्तानकडे आमिर, वहाब रियाझ आणि मोहम्मद सामी आहेत. तर भारताकडे आशीष नेहरा आणि जसप्रीत बुमराह आहेत.

संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आशीष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग.

पाकिस्तान : शाहीद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हाफीझ, शार्जील खान, उमर अकमल, शोएब मलिक, खुर्रम मंझूर, मोहम्मद नवाझ, सर्फराझ अहमद (यष्टिरक्षक), मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान, मोहम्मद सामी, वहाब रियाझ, अनार अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसिम.

सामन्याची वेळ : सायं. ७ वा.पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.