दादर युनियन आणि शिवाजी पार्क जिमखाना हे दोन संघ म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी, या दोन संघांमधील सामना हा भारत-पाकिस्तान लढतीसारखा गाजायचा. एकमेकांसमोर उभे ठाकल्यावर या संघांतील प्रत्येक खेळाडू हा जिवाचे रान करून विजयासाठी लढायचा. एकमेकांशी खुन्नस देणारे आणि आपल्या खडूस खेळाच्या जोरावर प्रतिस्पध्र्याला नेस्तनाबूत करण्यासाठी सरसावलेले हे खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर गुरुवारी दडकर मैदानात उभे ठाकले होते, पण या वेळी नजरेत खुन्नस नव्हती, चेहऱ्यावर द्वेष नव्हता, ओठांवर स्मित होते. एकमेकांच्या खांद्यांवर हात ठेवत, जुने किस्से सांगून त्यावर एकच हशे पिकत होते. निमित्त होते ते या दोन्ही संघामधल्या मैत्रीपूर्ण लढतीचे. दडकर मैदानात दर्दी रसिकांच्या साक्षीने रंगलेल्या या सामन्यात दादर युनियनने शिवाजी पार्क जिमखान्यावर मात केली.
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शिवाजी पार्कचे नेतृत्व केले, तर वासू परांजपे यांच्या कप्तानीखाली दादर युनियनचा संघ उतरला होता. नाणेफेक जिंकल्यावर परांजपे यांनी फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
भारताचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी या सामन्यात ट्वेन्टी-२० खेळाची झलक दाखवली. तीन षटकार आणि एका चौकारासह पाच चेंडूंमध्ये २४ धावा चोपून काढल्या. करसन घावरी, भरत नाडकर्णी, अवी कर्णिक आणि श्रीधर मांडले यांनी झकास फटकेबाजी केली. शिवाजी पार्क जिमखान्याचा संघ मैदानात उतरत असताना भारताचे माजी कर्णधार लिटिल-मास्टर सुनील गावस्कर यांचे मैदानात आगमन झाले. त्यांनी या वेळी खेळण्यापेक्षा पंच म्हणून काम पाहायला पसंती दिली.
भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकरही उशिरा दाखल झाला, पण आल्यावर त्याने दादर युनियनच्या संघाला प्रोत्साहन देण्याचे काम चोख बजावले. सामना संपल्यावर मुंबई क्रिकेटला पुन्हा एकदा गतवैभव कसे प्राप्त होईल, यावर खमंग चर्चा रंगू लागल्या.