मँचेस्टरच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने सलामीवीर शान मसूदच्या धडाकेबाज दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली. मसूदला पहिल्या डावात बाबर आझम आणि शादाब खान यांनी चांगली साथ दिली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा डाव संपेपर्यंत इंग्लंडने ९२ धावांत ४ गडी गमावले. रॉरी बर्न्स (४), डॉम सिबली (८), जो रूट (१४) आणि बेन स्टोक्स (०) झटपट बाद झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवसावर पाकिस्तानचे वर्चस्व राहिले.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार कामगिरी करणारा बेन स्टोक्स पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या डावात खातंही उघडू शकला नाही. मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर तो शून्यावर त्रिफळाचीत झाला. झटपट २ गडी बाद झाल्याने तो अब्बासने टाकलेले चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढत होता. पण त्याला ते फारसं जमलं नाही. अब्बासने टाकलेला चेंडू रिव्हर्स स्विंग होत स्टोक्सला चुकवून थेट स्टंपवर आदळला. चेंडू नक्की कसा आला हे न समजल्याने बाद झाल्यावर स्टोक्सही अवाक होऊन पाहत राहिला.

दरम्यान, पाकिस्तानच्या शान मसूदने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत एक बाजू लावून धरली. ३१९ चेंडूंचा सामना करताना शानने १८ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १५६ धावा केल्या. बाबर आझम (६९) आणि शादाब खान (४५) यांनीही काही काळ झुंज दिली. त्यामुळे पाकिस्तानला त्रिशतकी मजल मारता आली.