पाचव्या टी-20 सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर यांच्यात झालेल्या वादाबद्दल इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेद्वारे मॉर्गनने याविषयी पुढे चर्चा न करण्याचे सांगितले.
पाचव्या सामन्यानंतर मॉर्गन पत्रकार परिषदेत म्हणाला, ”या दोघांचे काय वाजले, ते मला माहीत नाही. विराट कोहली हा अ‍ॅनिमेटेड खेळाडू आहे आणि जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याची भूमिका खूप मोठी असते. त्याच्या आत खूप भावना आहे. जेव्हा सामने अटीतटीचे होतात, तेव्हा लोक अशा चर्चेत येतात. हे काही नवीन नाही.”

विराट-बटलरमध्ये वादावादी

पाचव्या टी-20 सामन्यादरम्यान विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर यांच्यात वाद झाला. जेव्हा बटलर बाहेर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा विराट कोहलीने त्याला ‘सेंड ऑफ’ दिला. ते बटलरला आवडले नाही. यानंतर पंचांनी येऊन हस्तक्षेप केला. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात जोस बटलरला बाद करुन इंग्लंडला दुसरा धक्का दिला.

टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. उद्या 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.त्यानंतर सर्व खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असतील.

असा झाला पाचवा टी-20 सामना

अतिशय रंगतदार झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी मात दिली. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतानेही इंग्लंडच्या निर्णयाचे स्वागत करत इंग्लंडसमोर 224 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अर्धशतके आणि सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीमुळे भारताला दोनशेपार पोहोचता आले.

प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने जोस बटलर आणि डेव्हि़ड मलान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कडवा संघर्ष केला. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद 188 धावांपर्यंतच पोहोचता आले. भुवनेश्वर कुमारला सामनावीर तर, विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.