क्रिकेट खेळताना त्याआधीच्या सरावाला खूप महत्व असते. अनेक वेळा सराव करतानाच खेळाडूला आपली बलस्थाने समजतात. त्यामुळे सराव सत्रात खेळाडूच्या प्रत्येक फटक्याकडे प्रशिक्षकांचे बारीक लक्ष असते. स्थानिक क्रिकेट कोचिंगमध्ये तर खेळाडूने चुकीचा फटका मारला की त्याला शिक्षाही दिली जाते. पण अशीच शिक्षा परदेशात दौरा सुरु असताना एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेडूळाला देण्यात तर… पण खरंच पाकिस्तानचा कसोटीपटू फखर झमान याला अशी एक शिक्षा देण्यात आली आहे.

सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी पाकिस्तानने जिंकली आहे. दुसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. या सराव सत्रादरम्यान फखर झमान हा खेळाडू नेट्समध्ये सराव करत होता. यावेळी प्रशिक्षक मिकी आर्थर हेदेखील होते. सराव करताना फखरने एका चेंडूवर चुकीचा फटका मारला. ते पाहून आर्थर यांनी फखरची कानउघाडणी केली आणि त्याला पिचवर २० पुश-अप्स मारायला सांगितले.

आर्थर मास्तरांची शिक्षा ही इतक्यावरच थांबली नाही. फखरने अशी चूक पुन्हा करू नये, म्हणून आर्थर यांनी त्याला खेळपट्टीवर धावायलाही लावले.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाज बाबर आझम दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्याच्या जागी फखरला अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.