भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सल्ला दिला आहे. धोनीने सातव्या क्रमांकावर खेळण्याऐवजी अव्वल क्रमात खेळायला यायला हवे, असे गंभीर म्हणाला. चेन्नईच्या यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात धोनी खातेही न उघडता बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानने त्याला बोल्ड केले.

गंभीर म्हणाला, ”धोनीने फलंदाजांच्या वरच्या फळीत येऊन खेळले पाहिजे, कारण पुढाकार घेऊन नेतृत्व करणे महत्वाचे आहे. एका लीडरला पुढे येऊन नेतृत्व करावे लागते. तुम्ही जर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असाल, तर तुम्ही नेतृत्व करू शकणार नाही.”

महेंद्रसिंह धोनीनं फलंदाजीसाठी वर यायला हवं -सुनील गावसकर

“चेन्नईच्या गोलंदाजी विभागात काही अडचणी आहेत. त्याशिवाय पाच वर्षांपूर्वी धोनी जसा मैदानात उतरून सुरुवातीपासून आक्रमक खेळायचा, तसा तो राहिलेला नाही. माझ्या मते, त्याने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी”, असेही गंभीरने सांगितले.

आज पंजाब विरुद्ध चेन्नई लढत

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज हे संघ आज मुंबईत आयपीएल 2021चा आठवा सामना खेळणार आहेत. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर चेन्नईला आज पंजाबला हरवून स्पर्धेत आत्मविश्वास कमावण्याची संधी असेल.

चेन्नई संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खूप चुका केल्या. त्यांनी सोपे झेलही सोडले होते आणि गोलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी नोंदवली होती. त्यामुळे अंतिम अकरा संघ निवडताना धोनीसमोर मोठा प्रश्न असणार आहे. चेन्नईची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याच्या संघात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी मागील काही काळापासून जास्त क्रिकेट खेळलेले नाही.