आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये चांगलाच घाम गाळत आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामन्यात कोणत्या खेळाडूंची निवड करायची असा प्रश्न कर्णधार विराट कोहलीसमोर उभा राहीला आहे. इंग्लंडमधील स्थिती पाहता गोलंदाजांवर खास मदार असणार आहे. त्यामुळे संघात किती वेगवान गोलंदाज खेळवायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या भारताच्या ताफ्यात चार वेगवान गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा हे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय आहेत. मात्र दोन फिरकीपटूंना स्थान द्यायचं ठरल्यास तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळणार आहे. त्यामुळे कुणाला बसावयचं असा प्रश्न कर्णधार विराट कोहली याला सतावत आहे. यासाठी फिरकीपटू हरभजन सिंग याने चिंतातूर विराटची समस्या दूर केली आहे. त्याने विराटसमोर एक पर्याय ठेवला आहे. त्यामुळे त्याची अडचण दूर होणार आहे.

“संघात ११ खेळाडूंची निवड करताना खेळाडूच्या सध्याच्या कामगिरीवर नजर मारणं गरजेचं आहे. मी जर कर्णधार असतो, तर मी तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरलो असतो. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला मी संधी दिली असती. इशांत शर्मचा सध्याची कामगिरी पाहता त्याच्याऐवजी मी सिराजला पसंती दिली असती. ऑस्ट्रलियातही सिराजने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजच्या पारड्यात मी वजन टाकलं असतं. सध्या सिराजची कामगिरी, त्याचा फिटनेस आणि त्याची गोलंदाजीची स्टाईल सर्वच लयीत आहे. त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळवण्यास हे गुण पुरेसे आहेत.”, असं भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

श्रीलंका दौऱ्यासाठी धवनकडे नेतृत्व; ऋतुराजला संधी

इशांत शर्माने आतापर्यंत १०१ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने ३३० गडी बाद केले आहेत. तर सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण केलं. त्यानंतर त्याची कामगिरीत सातत्याने चांगली होत आहे. मोहम्मद सिराजन आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने १६ गडी बाद केले आहेत.