News Flash

World Cup 2019 : पाकिस्तानची बांगलादेशवर मात, मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात

युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे ६ बळी

२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलेलं आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारत बांगलादेशला ३१६ धावांचं आव्हान दिलं. मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशला ७ धावांच्या आत सर्वबाद करायचं होतं. हे अशक्यप्राय आव्हान पाकिस्तानी गोलंदाज पूर्ण करु शकले नाहीत. फिरकीपटू मोहम्मद हाफिजने पहिलं षटक निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली. मात्र मोहम्मद आमिरच्या दुसऱ्याच षटकात बांगलादेशी सलामीवीरांनी ७ धावा काढत पाकिस्तानला स्पर्धेबाहेर ढकललं.

पाकिस्तानी गोलंदाजांनी बांगलादेशच्या सलामीच्या जोडीला फारकाळ मैदानावर स्थिरावू दिलं नाही. मात्र शाकीब अल हसनने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी गोलंदाजांचा नेटाने सामना करत शाकीबने अर्धशतकही झळकावलं. मात्र शाकीब अल हसन माघारी परतल्यानंतर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. युवा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने निम्मा संघ गारद करत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ६ बळी घेतले. अखेरीस २२१ धावांवर बांगलादेशचा डाव संपवत पाकिस्तानने ९४ धावांनी सामन्यात बाजी मारली, मात्र उपांत्य फेरी गाठण्याचं त्यांचं स्वप्न अपुरच राहिलं.

त्याआधी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आपलं आव्हान कायम टिकवण्यासाठी पाकिस्तानला किमान ३०८ धावा करणं गरजेचं होतं. इमाम उल-हक, बाबर आझम आणि इमाद वासिम या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारली.

सलामीवीर फखार झमान मोहम्मद सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. इमाम उल-हकने १०० चेंडूत १०० धावा झळकावत संघाचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावसी. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी केली. सैफुद्दीनने बाबर आझमला माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली. अवघ्या ४ धावांनी बाबर आझमचं शतक हुकलं. यानंतर शतकवीर इमाम उल-हकही हिट विकेट होऊन माघारी परतला. मोहम्मद हाफीज, हारिस सोहेल हे फलंदाजही झटपट माघारी परतले.

यानंतर मधल्या फळीत इमाद वासिमने ४३ धावांची फटकेबाजी करत पाकिस्तानला ३१५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमानने ५, मोहम्मद सैफुद्दीनने ३ तर मेहदी हसनने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 7:02 pm

Web Title: icc cricket world cup 2019 pakistan vs bangladesh lords psd 91
टॅग : Bangladesh,Pakistan
Next Stories
1 …तर मी इंग्लंडच्या रस्त्यांवर शर्ट काढून फिरेन: विराट कोहली
2 World Cup 2019 : धोनीने एक-दोन वर्ष क्रिकेट खेळत रहावं – लसिथ मलिंगा
3 World Cup 2019: रोहित शर्माला ‘हे’ तीन वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी
Just Now!
X