भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीची विकेट मिळाली तेव्हा हाँग काँगचा क्रिकेट संघाचा गोलंदाज एहसान खानचं एक स्वप्न पूर्ण झालं. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेत झालेल्या भारतीय संघाविरोधातील सामन्यात त्याला धोनीची विकेट मिळाली होती. एहसान खानने धोनीला शून्यावर बाद करत माघारी धाडलं होतं. भारताने हा सामना 26 धावांनी जिंकला होता. नुकतंच एहसान खान याने भविष्यात पुस्तक लिहिण्यासंबंधी माहिती देताना आपल्यासाठी धोनी क्रिकेटचा किंग असल्याचं म्हटलं आहे. भारताचा माजी कर्णधार आपल्या पुस्तकातील महत्त्वाचा विषय असेल असंही त्याने यावेळी सांगितलं.

‘जर सचिन देव असेल तर धोनी क्रिकेटचा किंग आहे’, अशा शब्दांत एहसान खानने धोनीचं कौतुक केलं आहे. ‘माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याचा माझा विचार आहे, आणि जेव्हा कधी मी ते लिहिन तेव्हा धोनी त्याचा मुख्य विषय असेल. माझ्या नातवाला मी ते वाचून दाखवेन, कारण धोनीचं आयुष्य एखाद्या परीकथेप्रमाणे आहे’, असं एहसान खान याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

हाँग काँग संघाकडून खेळताना एहसान खानने 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. आपण सचिन तेंडुलकर आणि धोनीची विकेट घेतल्याचं अनेकदा स्वप्नात पाहायचो असंही त्याने सांगितलं आहे. सचिन तेंडुलकरची विकेट घेण्याची संधी आपल्याला मिळाली नसल्याची खंतही त्याने यावेळी व्यक्त केली.

‘स्वप्नात अनेकदा मी सचिन तेंडुलकर आणि धोनीची विकेट घेतल्याचं पाहायचो. सचिनला करु शकलो नाही याचं दुख: आहे. म्हणून जेव्हा धोनीची विकेट मिळाली खाली झुकून सजदा केलं’, असं एहसान खानने सांगितलं आहे.