करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे वेळापत्रक अस्थिर बनले आहे. या सर्वाचा खेळाडूंच्या सरावावर परिणाम होत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी दिली.

प्रमुख देशांनी करोनाच्या भीतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने थॉमस आणि उबर चषक लांबणीवर टाकण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाला (बीडब्ल्यूएफ) घ्यावा लागला. ‘‘बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा लवकरच सुरू होतील हा आमच्या खेळाडूंमधील विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे. या स्थितीत सरावावरदेखील खेळाडू कमी मेहनत घेत असल्याचे आमच्या लक्षात येत आहे. डेन्मार्क चषक होत आहे ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब आहे. त्या स्पर्धेमुळे किमान खेळाडूंना सामन्यात खेळण्याचा तरी सराव मिळेल,’’ असे गोपीचंद म्हणाले.