* महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाहपदावर रमेश देवाडीकर विराजमान
* संयुक्त कार्यवाहपदाच्या पाच जागांवर आघाडीचाच वरचष्मा
* अध्यक्षस्थानी किशोर पाटील व कार्याध्यक्षपदावर दत्ता पाथरीकर यांची बिनविरोध निवड
कबड्डी विकास आघाडीने अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले. उमेदवारीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी आठ जागांवर मुसंडी मारणाऱ्या कबड्डी विकास आघाडीने रविवारी सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही शानदार विजयाची नोंद केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कबड्डीचा वसा घेऊन कार्य करणाऱ्या ठाण्याच्या रमेश देवाडीकर यांनी प्रतिष्ठेच्या सरकार्यवाहपदाच्या लढाईत शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू गणेश शेट्टी (सांगली) यांचा ५३-११ अशा मतांच्या फरकाने पराभव केला.
याचप्रमाणे धुळ्याचे मुझफ्फर अली अब्बास अली सय्यद (५५), परभणीचे मंगल पांडे (५५), नाशिक प्रकाश बोराडे (५३), अहमदनगरचे सुनील जाधव (५१), हिंगोलीचे प्रा. उत्तमराव इंगळे (५१) यांनी दिमाखदार मताधिक्यासह संयुक्त कार्यवाह पदावर दावेदारी सिद्ध
केली. मुंबईचे विश्वास मोरे आणि रत्नागिरीचे रवींद्र देसाई यांच्या वाटय़ाला फक्त १५ मते आली. किशोर पाटील, दत्ता पाथरीकर आणि रमेश देवाडीकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या कबड्डी विकास आघाडीने सर्वच्या सर्व १४ पदांवर आपले उमेदवार निवडून आणले. या मतदानामध्ये ७२ पैकी ६५ प्रतिनिधींनी हजेरी लावली.
निवडणूक गोषवारा
मतदार : २४ जिल्ह्य़ांचे ७२ प्रतिनिधी
मतदारांची हजेरी : ६५
गैरहजर : ७ (अजित पवार, गजानन कीर्तिकर, सुरेश वरपुडकर, बाळासाहेब भिलारे, राजवर्धन कदमबांडे, रमेशचंद्र तवरावाला, जयंत पाटील)
सरकार्यवाह (१ पद) : रमेश देवाडीकर (ठाणे)
संयुक्त कार्यवाह (५ पदे) : सुनील जाधव (अहमदनगर), प्रकाश बोराडे (नाशिक), मुजफ्फर अली अब्बास अली सय्यद (धुळे), उत्तमराव इंगळे (हिंगोली), मंगल पांडे (परभणी)

बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी
अध्यक्ष (१) : किशोर पाटील (औरंगाबाद)
उपाध्यक्ष (५) : संभाजी पाटील (कोल्हापूर), राम मोहिते (बीड), बबनराव लोकरे (उस्मानाबाद), बाबूराव चांदेरे (पुणे), किरण पावसकर (सिंधुदुर्ग).
कार्याध्यक्ष (१) : डॉ. दत्ता पाथरीकर (जालना)
खजिनदार (१) : शांताराम जाधव (पुणे)