IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये आहे. मात्र मर्यादित ठिकाणी सराव करण्यास खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेतल्यावर सर्व खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरल्याचे दिसून आले. टीम इंडियाला एका खेळाडूच्या दुखापतीची चिंता होती, पण तो खेळाडूदेखील तंदुरूस्त होऊन नेट्समध्ये परतल्याचं सुखावणारं चित्र दिसलं. BCCIने स्वत: ही मोठी अपडेट दिली.

IPL 2020 स्पर्धेत निवडक सामने खेळूनही धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वृद्धिमान साहाला मोक्याच्या वेळी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला संघात स्थान मिळालं होतं पण त्याच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. साहा तंदुरूस्त झाला तरच त्याला संघात खेळवता येईल अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी BCCIने एक व्हिडीओ शेअर केला. त्यात वृद्धिमान साहा नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्यामुळे तो कसोटी मालिकेसाठी फिट असल्याच्या वृत्ताला एकाअर्थी दुजोराच मिळाला आहे.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारताविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अनवाणी मैदानावर उतरणार असल्याचं कर्णधार टीम पेनने सांगितलं. “जगभरातील वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. या आधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही पण आता आम्ही हे नक्की करणार आहोत. हा वर्णभेदाचा निषेध करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल”, असे टीम पेनने स्पष्ट केलं.