भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’मध्ये अखेर समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’त IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले होते, पण धक्कादायकरित्या रोहित शर्माला वगळण्यात आलं होतं. त्यानंतर BCCI आणि निवड समितीवर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली. त्यानंतर अखेर रोहितला ऑस्ट्रेलियासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

BCCIने ट्विट करून काही बदलांबद्दल माहिती दिली. रोहित शर्माला केवळ कसोटी मालिकेसाठीच संघात समाविष्ट करण्यात आले आहे. वन डे आणि टी२० मालिकांमध्ये त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत रविवारी (१ नोव्हें) BCCIची वैद्यकीय समिती माहिती घेणार होती. त्यांनी त्यांचा अहवाल BCCI ला दिल्यानंतर रोहित शर्माच्या संमतीनेच असा निर्णय घेण्यात आला असल्याचे BCCIने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का गरोदर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना खेळून झाल्यावर विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. BCCIने त्याची रजा मंजूर केली असल्याचे पत्रकात सांगण्यात आले आहे. वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा हे दोघे अद्यापही तंदुरूस्त नसल्याने त्यांच्याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

टीम इंडिया कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

टीम इंडियामध्ये पदार्पणाची संधी मिळालेल्या वरूण चक्रवर्तीला खांद्याच्या दुखापतीमुळे दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज टी नटराजन याला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया टी२० संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

निवड समितीने वन डे मालिकेच्या संघात संजू सॅमसन याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून समाविष्ट करून घेतलं आहे, अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे.

टीम इंडिया एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

टीम इंडियाचा प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौरा

पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
————————————————————–
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
—————————————————————
पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा