भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपला. भारताने पहिला डाव ६२२ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ३२२ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतापेक्षा निम्म्याहुनही कमी धावा केल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली.

३ जानेवारीला हा सामना सुरु झाला. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्र्रेलिया यांच्यातील या सामन्यात भारताने यजमानांना ६ जानेवारीला म्हणजेच आज फॉलो-ऑन दिला. असाच एक योगायोग या आधीही घडला होता. सिडनीच्याच मैदानावर ६ जानेवारी १९८६ रोजी भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो-ऑन दिला होता. तशीच घटना २०१९ मध्येही घडली. हा योगायोग घडून आला असला तरी त्यापुढील योगायोग घडून येऊ नये असे प्रत्येक भारतीय चाहत्याला वाटत असले. कारण १९८६ साली तो सामना अनिर्णित राहिला होता. सध्या सुरु असलेला सामना रंगतदार अवस्थेत असून भारताला एका दिवसाच्या खेळात यजमानांचे १० गडी बाद करायचे आहेत.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळही अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर आजही पावसामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला. पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण वाया गेला. अखेर उपहाराच्या विश्रांतीनंतर दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यापुढे आज त्यांना पहिल्या डावात केवळ सर्वबाद ३०० पर्यंतच मजल मारता आली.