भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांची अर्धशतके यांच्या जोरावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितने १६१ धावा करत धावांचा दुष्काळ संपवला. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेल्या खेळीमुळे एक अजब योगायोग जुळून आला.

भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव ९५.५ षटकात संपुष्टात आला. योगायोगाची गोष्ट म्हणजे, पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही भारतीय फलंदाज ९५.५ षटकांतच बाद झाले होते. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावाच भारताकडून ऋषभ पंतने तडाखेबाज ९१ धावा ठोकल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदरने ८५ धावांची खेळी केली होती तर संयमी चेतेश्वर पुजाराने ७३ धावा केल्या होत्या.

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शुबमन गिल (०), चेतेश्वर पुजारा (२१), विराट कोहली (०) हे तिघे स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी १६२ धावांची भागीदारी केली. रोहित दीडशतक (१६१) ठोकून तर अजिंक्य अर्धशतक (६७) झळकावून माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतच्या नाबाद अर्धशतकी (५८) खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांनी निराशा केली. पंतच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अलीने ४, ओली स्टोनने ३, जॅक लीचने २ तर कर्णधार रूटने १ बळी घेतला.