कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक आणि त्याला शेवटच्या फळीतल्या फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने सेंच्युरिअन कसोटीत आपलं आव्हान कायम राखलं आहे. आफ्रिकेच्या ३३५ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र पहिल्या कसोटीत धावांची बरसात करणारा हार्दिक पांड्या या कसोटीत विराट कोहलीची साथ देऊ शकला नाही. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात हार्दिक धावबाद झाला. यानंतर विराट आणि आश्विन यांच्यात झालेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने २५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला खरा, मात्र आश्विनला माघारी धाडण्यात यश आल्यानंतर भारताचा डाव परत कोलमडला.

पहिल्या सत्रापर्यंत भारताने ८ गड्यांच्या मोबदल्यात २८७ धावांपर्यंत बाजी मारली होती. अखेर विराट कोहलीच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात आफ्रिकेने नाममात्र २८ धावांची आघाडी घेतली, मात्र दुसऱ्या डावात आफ्रिकेची सुरुवात काही चांगली झाली नाही. एडन मार्क्रम आणि हाशिम आमला हे दोन फलंदाज झटपट माघारी परतले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाज पायचीत झाले. मात्र यानंतर डीन एल्गर आणि एबी डिव्हीलियर्स जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनीही दुसऱ्या सत्राच्या अखेरीस अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर आफ्रिकेने चहापानापर्यंत २/६० अशी मजल मारली.

यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पंचांनी काहीकाळासाठी खेळ थांबवला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरु करण्यात आला, मात्र अंधुक प्रकाशामुळे खेळात व्यत्यय येत असल्यामुळे पंचांनी दोन्ही संघातील खेळाडूंच्या सहमतीने तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

  • तिसऱ्या दिवसाअखेरीस दक्षिण आफ्रिका ९०/२, आफ्रिकेकडे ११८ धावांची आघाडी
  • अंधुक प्रकाशाचा खेळात पुन्हा एकदा व्यत्यय, पंचांनी दिवसाचा खेळ थांबवला
  •  पावसाच्या खोळंब्यानंतर खेळाला सुरुवात
  • सामन्यात पावसाचा व्यत्यय, पंचांनी खेळ थांबवला
  • बुमराहचा आफ्रिकेला दुसरा धक्का, हाशिम आमला माघारी
  • दुसऱ्या डावात आफ्रिकेची अडखळती सुरुवात, एडन मार्क्रम बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी
  • भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला, आफ्रिकेकडे २८ धावांची आघाडी
  • मॉर्कलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली माघारी
  • मॉर्ने मॉर्कलला बाद करण्यात आफ्रिकेला यश, भारताचा नववा गडी माघारी
  • विराटचा आफ्रिकन गोलंदाजांवर हल्लाबोल सुरुच, दरम्यानच्या खेळीत विराटचं दिडशतक
  • इशांत – विराट कोहलीच्या भागीदारीमुळे भारताने ओलांडला ३०० धावांचा टप्पा
  • तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या सत्राची घोषणा, भारताची धावसंख्या २८७/८
  • मोहम्मद शमी माघारी, भारताला आठवा धक्का
  • वर्नेन फिलँडरच्या गोलंदाजीवर आश्विन माघारी, भारताला सातवा धक्का
  • रविचंद्रन आश्विन आणि विराट कोहलीमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • भारताने ओलांडला २५० धावांचा टप्पा, भारताची लक्ष्याकडे सावधपणे वाटचाल
  • रविचंद्रन आश्विन – विराट कोहली जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या धावबाद, भारताचा सहावा गडी माघारी
  • कोहली – पांड्या जोडीचा फटकेबाजीचा प्रयत्न, कर्णधार विराट कोहलीचं शतक
  • भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा, कर्णधार विराट कोहली शतकाच्या जवळ
  • तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात