इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी मंगळवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर गौतम गंभीरला टीम इंडियातून वगळण्यात आले असून भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुस-या सामन्यात भारताने दिमाखदार विजय मिळवून मालिकेत १- ० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. आता पहिली कसोटी पार पडल्यावर मंगळवारी निवड समितीने उर्वरित तीन सामन्यांसाठी संघाची निवड केली. दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौ-याला मुकला आहे. तर पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेल्या गौतम गंभीरला उर्वरित तीन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळल्यावरच त्याचा संघात समावेश करण्याबाबत विचार केला जाईल असा निर्णय प्रशिक्षक अनिल कुंबळेने घेतला होता. भुवनेश्वरकुमार रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळला होता. रणजीत भुवनेश्वरने ३६ षटकं टाकली. या दरम्यान त्याने दोन विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्णधारपदाची धूरा विराट कोहलीकडेच असून अजिंक्य रहाणे, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित होता. तर दुस-या कसोटीत भारताने इंग्लंडवर मात केली होती. आता तिसरी कसोटी २६ नोव्हेंबरपासून मोहालीत रंगणार आहे. यानंतर चौथी कसोटी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आणि शेवटची कसोटी चेन्नईत होणार आहे. यानंतर ख्रिसमसच्या कालावधीत इंग्लंडचा संघ मायदेशी परतेल आणि नवीन वर्षात एकदिवसीय मालिका आणि टी २० सामन्यांसाठी पुन्हा भारतात येणार आहे.
भारताच्या दृष्टीने जमेची बाब म्हणजे विराट कोहली, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाज धावांचा पाऊस पाडत आहे. गोलंदाजीत आर अश्विन आणि रविंद्र जडेजाची फिरकी संघाला विजय मिळवून देत आहे. त्यांना जयंत यादवची चांगली साथ मिळाली आहे. आता संघात भुवनेश्वर कुमारचाही समावेश झाल्याने गोलंदाजीची बाजू आणखी भक्कम झाली आहे. आर अश्विनने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही चमकदार कामगिरी केल्याने भारताला दिलासा मिळाला आहे.
Team : Virat (Capt), Rahane, Rahul, Vijay, Pujara, K Nair, Saha (WK), Ashwin, Jadeja, Jayant, Mishra, Shami, Umesh, Ishant, Bhuvi, Hardik
— BCCI (@BCCI) November 22, 2016