भुवनेश्वर-बुमराच्या समावेशामुळे भारताच्या वेगवान माऱ्याला बळकटी 

प्रशांत केणी, पुणे :

गुवाहाटी आणि विशाखापट्टणमला विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळी आणि दशसहस्र्ोषु विक्रमाच्या ‘विराटगाथे’चे पहिले दोन अध्याय लिहिले गेले. कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात असलेल्या विराटची गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील वर्चस्वपूर्ण कामगिरी पाहता शनिवारी पुण्यात विराटगाथेचाच तिसरा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता आहे. मात्र विशाखापट्टणमला शाय होपने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या चौकाराने केवळ दुसरा सामना ‘टाय’ केला नाही, तर मालिकेत रंगतही निर्माण केली आहे. वेगवान गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर भारताने तिसऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना पाचारण केले आहे.

विराटने पहिल्या दोन्ही सामन्यांत (१४० आणि नाबाद १५७) शतके झळकावली. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पा ओलांडताना सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. इतकेच नव्हे, तर गहुंजे मैदानावरील सर्वोच्च वैयक्तिक धावा (१२२) आणि सर्वाधिक एकूण धावा (२१२) ही आकडेवारीसुद्धा विराटसाठी अनुकूलच आहे. त्यामुळेच विराटकडून आणखी एका शतकाची अपेक्षा केली जात आहे.

कॅरेबियन संघाला भारत दौऱ्यावर अद्याप विजयाचे सूर्यदर्शन झालेले नाही. मात्र या दोन्ही सामन्यांत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी ३२०हून अधिक धावसंख्या उभारली आहे. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांचा बोथट वेगवान मारा हा त्याला कारणीभूत आहे. उमेशच्या अखेरच्या षटकांत भारताच्या अपेक्षित विजयाचे ‘टाय’मध्ये रूपांतर झाल्यानंतर निवड समितीला आणि संघव्यवस्थापनाला खडाडून जाग आली आहे. आता विंडीजचा संघ बरोबरीची टक्कर देण्याइतपत सज्ज झाल्यामुळे भुवनेश्वर आणि बुमरा यांच्यासह वेगवान मारा बळकट करण्यात आला आहे.

अंबाती रायुडूने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे नाबाद २२ आणि ७३ धावा काढून फलंदाजीच्या चौथ्या क्रमांकावरील दावा पक्का केला आहे. रायुडूने आशिया चषक तील सहा डावांमध्ये ४३.७५च्या सरासरीने १७५ धावा केल्या होत्या. मात्र पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानाची भारताची चिंता अद्याप मिटलेली नाही. विशाखापट्टणमला महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना संधीचे सोने करता आले नाही.

वेस्ट इंडिजची मदार हेटमायर, होपवर

शिम्रॉन हेटमायर आणि शाय होप यांच्या धावांचे सातत्य हे वेस्ट इंडिजचे प्रमुख बलस्थान आहे. २१ वर्षीय हेटमायरने दोन सामन्यांत अनुक्रमे १०६ आणि ९४ धावा केल्या आहेत, तर होपने अनुक्रमे ३२ आणि नाबाद १२३ धावा केल्या आहेत. मात्र अनुभवी मार्लन सॅम्युअल्स अद्याप धावांसाठी (दोन सामन्यांत १३ धावा) झगडतो आहे. कायरेन पॉवेल, जेसन होल्डर, चंदरपॉल हेमराज अपेक्षांना साजेसा खेळ दाखवू शकलेले नाहीत. केमार रोचच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीच्या माऱ्याला फलंदाजांइतकाही प्रभाव दाखवता आलेला नाही. होल्डर, ओशाने थॉमस या वेगवान गोलंदाजांसह अ‍ॅश्ले नर्स आणि देवेंद्र बिशू हे फिरकी गोलंदाजसुद्धा महागडे ठरले आहेत.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिन अ‍ॅलीन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, कायरेन पॉवेल, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅकॉय.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.

१ भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा पहिलाच सामना होत आहे.

२ या मैदानावर भारतीय संघ आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळला आहे. यापैकी २०१३मध्ये झालेला पहिला सामना भारताने गमावला होता. मात्र २०१७मध्ये भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध विजय मिळवले आहेत.