|| प्रशांत केणी

इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर वेगवान मारा आणि फिरकीपुढे फलंदाजांची तारांबळ उडत आहे. गोलंदाजांचे वर्चस्व विश्वचषकामधील सुरुवातीच्या काही सामन्यांतून अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच भारताच्या विश्वविजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण जगातील सर्वोत्तम गोलंदाजीचा मारा भारताकडे असल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या एकदिवसीय संघाची कामगिरी गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगतिपथावर आहे, याचे श्रेय गोलंदाजीच्या माऱ्याला जाते. भारताने २०१७मध्ये २७ सामन्यांपैकी २१ सामने जिंकले, २०१८मध्ये २० सामन्यांपैकी १४ सामने जिंकले, तर चालू वर्षांत १३ पैकी ८ सामने जिंकले आहेत. भारताचे हे यश फक्त देशातील नव्हे, तर परदेशातील खेळपट्टय़ांवरचेसुद्धा आहे. गेल्या काही महिन्यांत भारताने मायदेशात वेस्ट इंडिजला ३-१ अशी धूळ चारली, तर ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करली. परंतु ऑस्ट्रेलियातील २-१ आणि न्यूझीलंडमधील ४-१ हे मालिका विजय भारतासाठी प्रेरक ठरणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजांमध्ये अग्रस्थानी असलेला जसप्रीत बुमरा या माऱ्याची समर्थपणे धुरा वाहात आहे. सुरुवातीच्या आणि अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजांना जखडून ठेवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. २०१८ या कॅलेंडर वर्षांत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण ७८ बळी त्याने मिळवले आहेत. यापैकी १३ सामन्यांतील २२ बळी ही आकडेवारी त्याच्या भेदकतेची ग्वाही देते. बुमराने गतवर्षी कसोटी पदार्पण करून १० सामन्यांत ४९ बळी मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टय़ांवर त्याने पाच बळी घेण्याची किमयासुद्धा साधली आहे. त्यामुळेच बुमरापासून सावध राहण्याचा सल्ला अनेक माजी क्रिकेटपटू अन्य संघांना देत आहेत.

मोहम्मद शमी टिच्चून गोलंदाजी करीत आहे. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने आपल्या सातत्याची कमाल दाखवली आहे. वर्षांच्या पूर्वार्धात बुमराला विश्रांती दिली असताना, शमीने सात एकदिवसीय सामन्यांत १४ बळी घेत आपली छाप पाडली होती. १४० किमी प्रति ताशी वेग, स्विंग ही भुवनेश्वर कुमारच्या भात्यामध्ये प्रभावी अस्त्रे आहेत. वर्षांरंभी झालेल्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १५ बळी मिळवले आहेत. याचप्रमाणे सामन्याचे चित्र पालटू शकणारा हार्दिक पंडय़ा मधल्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करतो, तर मध्यमगती गोलंदाज विजय शंकर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहे.

कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांच्यासारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज भारतात घडले. परंतु तोलामोलाची साथ न मिळाल्यामुळे हे तिघेही एकांडे शिलेदार ठरले. परिणामी भारताच्या वेगवान माऱ्याचा दबदबा कधीच निर्माण होऊ शकला नाही. पण आता भारताच्या वेगवान माऱ्याची दखल मातब्बर संघांनाही घ्यावी लागत आहे. कारण बुमरा, शमी, भुवनेश्वर, हार्दिक हे एकमेकांना पूरक साथ देत आहेत.

अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाकडे परिपक्वता आहे. याशिवाय कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल हे दोन मनगटी फिरकी गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर आणि अफगाणिस्तानच्या रशीद खान इतकेच धोकादायक आहेत. गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावणाऱ्या या जोडीने महत्त्वाचे बळी मिळवून सामन्यांना कलाटणीसुद्धा दिली आहे. गेल्या वर्षी भारताने दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिका ५-१ अशा फरकाने जिंकण्याचा पराक्रम दाखवला. या विजयात ‘चायनामन’ कुलदीपच्या १७ बळींचा सिंहाचा वाटा होता. भारताने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका १-२ अशा फरकाने गमावली. पण कुलदीपच्या खात्यावर नऊ बळी जमा होते. गतवर्षी भारताने आशिया चषकावर नाव कोरले. या विजयातही कुलदीपचे एकूण १० बळींचे योगदान होते. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत त्याने चार सामन्यांत नऊ बळी मिळवले. चालू वर्षांतही त्याने सहा सामन्यांत १० बळी मिळवले असल्यामुळे विश्वचषकासाठी तो प्रथमपसंतीचा फिरकी गोलंदाज असेल. मागील वर्षी लेग-स्पिनर चहलने दक्षिण आफ्रिकेत १६, इंग्लंडमध्ये २, आशिया चषकात ६ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ५ बळी मिळवले आहेत. चालू वर्षांतील सहा सामन्यांत त्याच्या खात्यावर १५ बळी जमा आहेत. केदार जाधव हा कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करतो. परंतु मोक्याच्या क्षणी मैदानावर जमलेली भागीदारी भेदण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे.

भारताच्या विश्वचषक मोहिमेला ५ जूनपासून प्रांरभ होत आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मग पाकिस्तानचे आव्हान समोर असेल. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी यांच्यासारख्या दर्जेदार फलंदाजांना गोलंदाजीच्या माऱ्याची अपेक्षेप्रमाणेच साथ लाभली, तर भारताला राऊंड रॉबिनचा अडथळा पार करणे मुळीच कठीण नसेल.