खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेलं औषध उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला चांगलंच महागात पडलंय. डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने पृथ्वीला बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान यावरुन लोकप्रिय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी भारतीय क्रिकेटची धूरा सांभाळणाऱ्यांना पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळावं आणि योग्य मार्ग दाखवावा असा सल्ला दिला आहे.

‘या लहान मुलाने कठोर मेहनत करुन यश मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटने पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळायला हवं आणि त्याला योग्य मार्ग दाखवायला हवा’. असा सल्ला ट्विटरद्वारे हर्षा भोगले यांनी भारतीय क्रिकेटची धूरा सांभाळणाऱ्यांना दिला आहे.


बीसीसीआयकडून पृथ्वीला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 असा निलंबनाचा कालावधी असेल. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘प्रामाणिकपणे मी माझी चूक स्वीकारत आहे. गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधे घेताना माझ्याकडून हे घडले असावे. क्रिकेट हे माझे आयुष्य असून मुंबईचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर दमदार पुनरागमन करण्याचा माझा मानस आहे’, असे ट्विट पृथ्वी शॉने केले आहे. ‘‘युवा खेळाडूंनी औषधे घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. माझ्या या चुकीमुळे अन्य खेळाडूंनाही योग्य तो समज मिळेल. खेळाडूंनी ‘वाडा’च्या नियमांचे पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे,’’ अशी प्रतिक्रिया पृथ्वीने दिली आहे.