भारतीय महिला क्रिकेट संघाची टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर आता आणखी एक जबाबदारी असणार आहे. महिला विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्वाचा वाटा असलेल्या हरमनप्रीतला अखेर पंजाब पोलिसांमध्ये पोलिस उप-अधिक्षक पदावर रुजू करुन घेण्यात आलेलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलीस महासंचालक सुरेश अरोरा यांनी हरमनप्रीतच्या खांद्यावर विशेष स्टार लावत तिला शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यानंतर हरमनप्रीत कौरनेही ट्विटरवरुन दोघांचेही आभार मानत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

पंजाब पोलिसांमध्ये दाखल होण्याआधी हरमनप्रीत कौर भारतीय रेल्वेचं प्रतिनिधीत्व करत होती. मात्र मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हरमनप्रीतला रेल्वेच्या सेवेतून मुक्त करण्यात आलं. यासाठी रेल्वेने हरमनप्रीतसोबत करण्यात आलेल्या करारातील अटींचा तिला त्रास होऊ नये यासाठी अमरिंदर सिंह यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचीही भेट घेतली होती.

भारतीय रेल्वेसोबत करण्यात आलेल्या करारानुसार पाच वर्षांची सेवा झाल्याशिवाय हरमनप्रीतला रेल्वेची नोकरी सोडता येणार नव्हती. महिला विश्वचषकापर्यंत हरमनप्रीतने ३ वर्ष पश्चिम रेल्वेत कार्यालयीन अधिक्षक पदावर काम केलं होतं. मात्र आता हरमप्रीत आपल्या राज्यातील पोलीस दलाकडून खेळू शकणार आहे.