रविवारचा दिवस आणखी एका रंगतदार लढतीने गाजला. अखेरच्या षटकात कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. पण भुवनेश्वर कुमारच्या वेगवान माऱ्याचा आरामात मुकाबला करीत रयान टेन डोइश्चॅटने एक षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकाताने ७ विकेट आणि २ चेंडू राखून विजय मिळवताना आयपीएल गुणतालिकेतील आपले चौथे स्थान टिकवले आहे. सामनावीर पुरस्कारावर उमेश यादवने नाव कोरले.
गौतम गंभीरने (६) निराशा केल्यावर रॉबिन उथप्पा (४०) आणि मनीष पांडे (३५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. त्यानंतर आलेल्या युसूफ पठाणने पांडेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची आणि डोइश्चॅटसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ४२ धावांची भागीदारी करून संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. पठाणने २८ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३९ धावा केल्या, डोइश्चॅटने १५ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २५ धावा केल्या.
त्याआधी, कोलकाताच्या गोलंदाजांनी हैदराबादला ८ बाद १४२ धावसंख्येवर सीमित ठेवले. हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ३४ धावा (१८ चेंडूंत) काढल्या. याशिवाय नमन ओझा (२२) आणि इरफान पठाण (नाबाद २३) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कर्णधार गौतम गंभीरने गोलंदाजांचा अतिशय खुबीने वापर केला. वेगवान गोलंदाज उमेश यादवने २६ धावांत ३ बळी घेतले, तर डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने २२ धावांत २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४२ (डेव्हिड वॉर्नर ३४, इरफान पठाण २३ नाबाद; उमेश यादव ३/२६, शाकिब अल हसन २/२२) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.४ षटकांत ३ बाद १४६ (रॉबिन उथप्पा ४०, मनीष पांडे ३५, युसूफ पठाण नाबाद ३९, रयान टेन डोइश्चॅट नाबाद २५; करण शर्मा १/१९)
सामनावीर : उमेश यादव.

संघ    सा.    वि.    प.    गु.
पंजाब    १०    ८    २    १६
चेन्नई    ११    ८    ३    १६
राजस्थान    ११    ७    ४    १४
कोलकाता    ११    ६    ५    १२
बंगळुरू    ११    ५    ६    १०
हैदराबाद    ११    ४    ७    ८
मुंबई    १०    ३    ७    ६
दिल्ली    ११    २    ९    ४