अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या आयपीएल सामन्यांसाठी आता सर्व संघ सज्ज झालेले आहेत. सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे. स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम अत्यंत महत्वाचा असणार आहे. दोन वर्षांमध्ये प्रेक्षकांचा गमावलेला विश्वास परत मिळवण्याचं मोठं काम चेन्नई सुपरकिंग्जला करावं लागणार आहे. यावेळी चेन्नईत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असताना, कर्णधार महेंद्रसिंह धोनी भावुक झाला आणि काही काळासाठी त्याच्या अश्रुंचा बांध फुटला.

स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा लादण्यात आली होती. या दोन वर्षांच्या कालावधीत धोनी पुणे सुपरजाएंट संघाकडून खेळला होता. या दोन वर्षांमध्ये चेन्नई संघाशी आपलं असणारं नातं याबद्दल बोलत असताना धोनीच्या डोळ्यात अश्रु आले, यावेळी त्याचा सहकारी रैनाने त्याला पाणी देत त्याला आधार दिला.

आयपीएलच्या दहा हंगामामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ सर्वात यशस्वी मानला जातो. धोनीच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चेन्नईने २०१० आणि २०११ या वर्षांचं विजेतेपद मिळवलं आहे, याचसोबत ४ हंगामांची उप-विजेतेपद चेन्नईच्या खात्यात जमा आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचा लक्ष असणार आहे.