आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ अद्यापही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. रविवारी घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने बंगळुरुवर ४ गडी राखून मात केली. कर्णधार श्रेयस अय्यरने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. १५० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावणं बंगळुरुच्या गोलंदाजांना जमलं नाही. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीचा आजच्या सामन्यातला विजय आणखीनच सोपा झाला. या पराभवासोबत आयपीएलच्या इतिहासात RCB च्या नावावर अपमानजनक कामगिरीचीही नोंद झाली आहे.

२०१३ साली दिल्लीच्या संघालाही सलग सहा पराभवांना सामोरं जावं लागलं होतं. बंगळुरुने आज या विक्रमाशी बरोबरी केली. बंगळुरुने दिलेलं १५० धावांचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं. या सामन्यातही विराटच्या संघाला गोलंदाजांचा स्वैर मारा आणि क्षेत्ररक्षकांच्या ढिसाळ कामगिरीचा फटका बसला.

अवश्य वाचा – IPL 2019 : सामना गमावूनही विराटचा विक्रम

आयपीएलच्या इतिहासात सलग सामने गमावणाऱ्या संघाची यादी –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – २०१९ (सलग ६ सामन्यांत पराभव)

दिल्ली डेअरडेविल्स (सध्याचं दिल्ली कॅपिटल्स) – २०१३ (सलग ६ सामन्यात पराभव)

डेक्कन चार्जर्स (सध्याचं सनराईजर्स हैदराबाद) – २०१२ (सलग ५ सामन्यात पराभव)

मुंबई इंडियन्स – २०१४ (सलग ५ सामन्यात पराभव)

गेल्या काही हंगामांमध्ये बंगळुरुच्या कामगिरीचा आलेखही उतरताच सुरु आहे.

सामना संपल्यानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आपला पराभव सरळ शब्दांत मान्य केला. “आमच्या दृष्टीने या खेळपट्टीवर १६० ही धावसंख्या पुरेशी होती. १५० धावसंख्येवरही सामना जिंकता आला असता. मात्र फलंदाजीदरम्यान आम्ही ठराविक अंतराने विकेट गमावत राहिलो. गोलंदाजीदरम्यानही आम्ही अनेक संधी गमावल्या. त्यामुळे प्रत्येक पराभवानंतर मी वेगळं कारण सांगू इच्छित नाही. सामन्यादरम्यान विजयासाठी ज्या संधी येतात त्याचा उपयोग व्हायलाच हवा.” त्यामुळे आगामी सामन्यांत विराटच्या RCB ला सूर सापडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.