गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या IPL 2020 वर करोनाचं सावट होतं. प्रेक्षकांशिवायच हे सामने खेळवावे लागले होते. मात्र, यंदा करोनाच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर थेट स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचे सामने बघण्याची वाट तमाम क्रिकेट चाहते आतुरतेनं पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर IPL 2021 नेमकी कधी सुरू होणार? ती कुठे होणार, भारतात की युएईमध्ये? याविषयी क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण ही उत्सुकता आता लवकरच संपणार असून यंदाच्या आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. GC अर्थात आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार आयपीएलची तारीख आणि ठिकाण यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

 

कधी सुरू होणार IPL 2021?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ चे सामने सुरू होणार आहेत. गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात जीसीची मीटिंग होणार असून त्यामध्ये तारखांवर शिक्कामोर्तब होईल. त्यानुसार ९ एप्रिल रोजी आयपीएल सुरू होणार असून ३० मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होईल.

कुठे होणार आयपीएलचे सामने?

दरम्यान, तारखांबाबत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर निश्चित माहिती असली, तरी अद्याप आयपीएल स्पर्धेतील सामने कुठे भरवले जावेत? याविषयी काहीही ठरवण्यात आलेले नाही. बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्याच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सुरुवातीला आयपीएलमधील सामने एकाच शहरात भरवण्याचा विचार सुरू होता. मात्र, आता करोनाची परिस्थिती सामान्य होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर एकापेक्षा अधिक शहरांमध्ये सामने भरवण्याचा देखील विचार सुरू आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांचा प्रामुख्याने विचार होत आहे’, असं समजतंय.

यंदाही असणार बायो-बबलची बंधनं!

याशिवाय, ज्याप्रकारे गेल्या वर्षी आयपीएलमध्ये बायो-बबल आणि करोनासंदर्भातले इतर नियम खेळाडूंना पाळणं बंधनकारक करण्यात आलं होतं, त्याचप्रकारे यंदाही खेळाडूंना नियम बंधनकारक करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.