News Flash

MI vs KKR IPL 2021 Live Update : मुंबईचा पहिला विजय, रंगतदार सामन्यात कोलकातावर मात

मुंबईच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी

मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर 10 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मॉर्गनने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. अचूक रणनितीमुळे कोलकाताने मुंबई इंडियन्सला 20 षटकात 152 धावांवर सर्वबाद केले. रसेलने 18व्या षटकात गोलंदाजीला येत 2 षटकात 15 धावा देत 5 बळी घेतले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने चांगली सुरुवात केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे कोलकाताने हा सामना गमावला. मुंबईकडून राहुल चहरने 4 बळी घेत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

कोलकाताचा डाव

मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताच्या विजयाचा पाया रचणार असे वाटत असताना राहुल चहर मुंबईसाठी धावून आला. त्याने गिलला वैयक्तिक 33 धावांवर माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चहरने ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही तंबूचा मार्ग दाखवला. दुसऱ्या बाजुला असलेल्या नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्याला आपली खेळी वाढवता आली नाही. चहरने त्यालाही बाद करत कोलकाताचे संकट वाढवले. राणाने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या.

राणा बाद झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपला फास अधिकच आवळला. अपेक्षित धावा आणि चेंडू यांचे अंतर वाढतच गेले. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना तंबुचा मार्ग दाखवला आणि मुंबईने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.

मुंबईचा डाव

मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डि कॉकला संधीचे सोने करता आले नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. पहिल्या धक्क्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सांभाळले. त्याने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा धारण करत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान त्याने रोहितसोबत 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली. सूर्यकुमारने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर मुंबईला आपली धावगती वाढवता आली नाही. संयमी खेळी करणारा रोहितही वैयक्तिक 43 धावांवर माघारी परतला. कमिन्सने त्याला बोल्ड केले.

सूर्यकुमार-रोहितच्या विकेटनंतर कोलकाताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. 18व्या षटकात मॉर्गनने अष्टपलू खेळाडू आंद्रे  रसेलच्या हातात चेंडू सोपवला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. रसेलव्यतिरिक्त पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.

दोन्ही संघाची प्लेईंग XI

मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव,  जसप्रीत बुमराह, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, ईशान किशन, क्विंटन डि कॉक, मार्को जानसेन.

कोलकाता : शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ईऑन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, शाकिब अल हसन, हरभजन सिंग.

Live Blog
23:22 (IST)13 Apr 2021
मुंबईची कोलकातावर 10 धावांनी बाजी

शेवटच्या षटकात कोलकाताला 15 धावांची गरज होती. मात्र, बोल्टने या षटकात रसेल आणि कमिन्स यांना बाद केले. शिवाय, त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत अवघ्या 4 धावा दिल्या.

23:10 (IST)13 Apr 2021
शेवटच्या षटकात कोलकाताला 15 धावांची गरज

मुंबईकडून ट्रेंट बोल्ट टाकतोय शेवटचे षटक

22:49 (IST)13 Apr 2021
कोलकाताचा अर्धा संघ तंबूत, शाकिब झेलबाद

राणापाठोपाठ शाकिब अल हसनही माघारी परतला. कृणाल पंड्याने त्याला बाद केले. कोलकाताला विजयासाठी 28 चेंडूत 31 धावांची गरज आहे.

22:46 (IST)13 Apr 2021
कोलकाताला चौथा धक्का, राणा माघारी

फिरकीपटू राहुल चहरने आपल्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर राणाला बाद केले. राणाने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावांची खेळी केली. 

22:33 (IST)13 Apr 2021
कोलकाताचा कर्णधार मॉर्गन माघारी

राणाच्या अर्धशतकानंतर मॉर्गन बाद झाला. मॉर्गन चहरचा तिसरा बळी ठरला. 

22:32 (IST)13 Apr 2021
नितीश राणाचे सलग दुसरे अर्धशतक

नितीश राणाने आयपीएल 2021मधील सलग दुसरे अर्धशतक साकारले. 

22:23 (IST)13 Apr 2021
राहुल चहरचा दुसरा बळी

मागील सामन्यात अर्धशतक झळकावलेला राहुल त्रिपाठी या सामन्यात अपयशी ठरला. चहरने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. त्रिपाठीेने 5 धावा केल्या. कोलकाताने 11 षटकात 2 बाद 85 धावा केल्या.

22:18 (IST)13 Apr 2021
कोलकाताला पहिला धक्का, गिल बाद

9व्या षटकात कोलकाताला पहिला धक्का बसला. राहुल चहरने शुबमन गिलला झेलबाद केले. गिलने 33 धावा केल्या.

21:58 (IST)13 Apr 2021
कोलकाताची दमदार सुरुवात

पहिल्या पॉवरप्लेमध्ये कोलकाताने बिनबाद 45 धावा फलकावर लावल्या.

21:28 (IST)13 Apr 2021
कोलकाताच्या डावाला सुरुवात

कोलकाताचे सलामीवीर नितीश राणा आणि शुबमन गिल मैदानात

21:17 (IST)13 Apr 2021
मुंबई 152 धावांवर सर्वबाद

कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंंद्रे रसेलने डावाच्या 18 व्या षटकात गोलंदाजीला येत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याने 2 षटकात 15 धावा देत 5 बळी घेतले.  रसेलच्या दमदार कामगिरीमुळे मुंबईचा संघ 152 धावांवर आटोपला.

21:03 (IST)13 Apr 2021
मुंबईचा सातवा फलंदाजही तंबूत

पोलार्डनंतर फलंदाजीला आलेला मार्को जानसेनला भोपळाही फोडता आला नाही. रसेलचा तो दुसरा बळी ठरला.

21:00 (IST)13 Apr 2021
मुंबईचा डाव गडगडला

हार्दिकपाठोपाठ कायरन पोलार्डही अपयशी ठरला. रसेलने त्याला वैयक्तिक 5 धावांवर झेलबाद केले. 

20:56 (IST)13 Apr 2021
मुंबईचा अर्धा संघ गारद

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मुंबईसाठी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. प्रसिध कृष्णाने त्याला वैयक्तिक 15 धावांवर बाद केले.

20:47 (IST)13 Apr 2021
मुंबईला मोठा धक्का, रोहित शर्मा बाद

डावाच्या 16व्या षटकात पॅट कमिन्सने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. रोहितने 3 चौकार आणि एका षटकारासह 43 धावांची खेळी केली. 

20:38 (IST)13 Apr 2021
मुंबई इंडियन्स शंभरीपार

मुंबईने 14 षटकात 3 बाद 106 धावा केल्या आहेत. 

20:25 (IST)13 Apr 2021
सूर्यकुमारपाठोपाठ किशन माघारी

सूर्यकुमारनंतर मैदानात आलेला ईशान किशन एका धावेची भर घालून बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला कृष्णाकरवी झेलबाद केले.

20:20 (IST)13 Apr 2021
मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार बाद

अर्धशतक करून सूर्यकुमार शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.

20:18 (IST)13 Apr 2021
सूर्यकुमार यादवचे अर्धशतक

दहाव्या षटकात सूर्यकुमारने कमिन्सला षटकार ठोकत 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दहा षटकात मुंबईने 1 बाद 81 धावा उभारल्या.

20:06 (IST)13 Apr 2021
रोहित-सूर्यकुमारची अर्धशतकी भागीदारी

डावाच्या आठव्या षटकात रोहित-सूर्यकुमारने 37 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 8 षटकात मुंबईने 1 बाद 64 धावा उभारल्या.

19:57 (IST)13 Apr 2021
पहिल्या 6 षटकात मुंबईच्या 1 बाद 42 धावा

पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने 1 बाद 42 धावा काढल्या. यातील पहिली पाच षटके फिरकीपटूंनी टाकली.

19:44 (IST)13 Apr 2021
सूर्यकुमारची धमाकेदार सुरुवात

डि कॉकनंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमारने धमाकेदार सुरुवात केली आहे. हरभजनच्या एकाच षटकात त्याने 3 चौकार लगावले.

19:40 (IST)13 Apr 2021
मुंबईला पहिला धक्का, डि कॉक बाद

दुसऱ्याच षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर डि कॉक बाद झाला. राहुल त्रिपाठीने त्याचा झेल टिपला.  डि कॉकने 2 धावा केल्या.

19:35 (IST)13 Apr 2021
रोहित-डि कॉककडून डावाची सुरुवात

मुंबईकडून रोहित-डि कॉकने डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या षटकात 3 धावा केल्या.

19:18 (IST)13 Apr 2021
मुंबईच्या संघात एकमेव बदल

क्वारंटाइन कालावधी संपूवन क्विंटन डि कॉकने ख्रिस लिनच्या ऐवजी मुुंबई संघात जागा मिळवली आहे. 

19:14 (IST)13 Apr 2021
नाणेफेक जिंकून कोलकाताची प्रथम गोलंदाजी

कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Next Stories
1 Mumbai Indians चा ‘हा’ खेळाडू आहे अभिषेक बच्चनचा फेव्हरेट!
2 IPL 2021 : “धोनीला दंड झाला, मग राहुल आणि सॅमसनला…!” दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर आकाश चोप्रांचं ट्वीट!
3 IPL 2021 : चेन्नईत विजयाची गुढी उभारण्यासाठी मुंबई सज्ज
Just Now!
X