News Flash

जयवीरू!

फलंदाजीचे कुरण असलेल्या आयपीएलमध्ये शुक्रवारी धावांचा धुवाँधार पाऊस साऱ्यांनाच अनुभवायला मिळाला.

| May 31, 2014 06:29 am

जयवीरू!

फलंदाजीचे कुरण असलेल्या आयपीएलमध्ये शुक्रवारी धावांचा धुवाँधार पाऊस साऱ्यांनाच अनुभवायला मिळाला. पहिल्या डावात वीरेंद्र सेहवागचे तडफदार शतक, तर दुसऱ्या डावात सुरेश रैनाची झंझावाती खेळी. सेहवागच्या शतकाच्या जोरावर एकीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने २२६ धावांचा डोंगर उभारला. पण रैनाचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांच्या हाराकिरीमुळे चेन्नईला २४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाबला या सामन्यात दोन गोष्टी गवसल्या, त्या म्हणजे वीरूचा फॉर्म आणि हरवलेला विजय. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत स्थान पटकावले असून त्यांचा सामना रविवारी कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे.
पंजाबच्या धावसंख्येचा पाठलाग करताना रैनाने पंजाबवर अफलातून हल्ला चढवला. परविंदर अवानाच्या सहाव्या षटकात तर त्याने २ षटकार आणि ५ चौकारांसह ३३ धावा काढल्या. गोलंदाजांवर चौफर हल्ला चढवत त्याने संघाला ५.६ षटकांत शंभरी गाठून देत सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला खरा, पण त्याची ही खेळी व्यर्थच ठरली. रैनाने अवघ्या २५ चेंडूंत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ८७ धावांची घाणाघाती खेळी साकारली. पण रैना बाद झाल्यानंतर फलंदाजांनी हाराकिरी केली. अखेरच्या षटकांमध्ये सामना फिरवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीलाही (नाबाद ४२) हे आव्हान पेलवता आले नाही आणि चेन्नईला सामना गमवावा लागला.
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला खरा, पण सेहवागच्या शतकी झंझावातापुढे त्यांचा पालापाचोळ झाला. पहिल्या तीन षटकांमध्ये सावध खेळ करणाऱ्या पंजाबने इश्वर पांडेच्या चौथ्या षटकांत सर्वाधिक २४ धावा लुटल्या आणि तिथून सेहवाग तळपायला सुरुवात झाला आणि त्याच्या तप्त किरणांनी चेन्नईच्या गोलंदाजांना घामटे फुटायला सुरुवात झाली. पाचव्या षटकात आशिष नेहराचे स्वागत त्याने सलग तीन चौकारांनी केले. सातव्या षटकात त्याने फिरकीपटू आर. अश्विनचे षटकाराने स्वागत केले. रवींद्र जडेजालाही त्याने पहिला फटका षटकार लगावत आपला हिसका दाखवला. एकिकडे सेहवागचे जोरकस फटक्यांच्या चाहत्यांवर अभिषेक होत होता, तर दुसरीकडे चाहत्यांच्या मुखातून ‘वीरू’, ‘वीरू’ हा जप अखंड सुरु होता. २१ व्या चेंडूवर एकेरी धाव काढत सेहवागने अर्धशतक लगावले. त्यानंतर चौफेर फटकेबाजी करत मैदान दणाणून सोडले आणि ५० चेंडूंमध्ये आयपीएलमधले दुसरे शतक झळकावले. या शंभरीमध्ये १० चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. सेहवागने १२२ धावांची अप्रतिम खेळी ५८ चेंडूंत १२ चौकार आणि ८ षटकारांनी सजवली व त्यामुळेच पंजाबला २२६ धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद २२६ (वीरेंद्र सेहवाग १२२, डेव्हिड मिलर ३८, मनन वोहरा ३४; आशिष नेहरा २/५१) विजयी वि. चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ७ बाद २०२ (सुरेश रैना ८७, महेंद्रसिंग धोनी नाबाद ४२; परविंदर अवाना २/५९, अक्षर पटेल १/२३).
सामनावीर : वीरेंद्र सेहवाग.

‘वीर’रसातले विक्रम
* यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा करण्याचा मान सेहवागने (१२२) पटकावला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या लेंडल सिमोन्सने पंजाबविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी साकारली होती.
* यंदाच्या आयपीएलमधील हे सर्वात जलद शतक ठरले आहे. सेहवागने ५० चेंडूंत शतक झळकावले आणि त्याच्या शंभर धावांमध्ये ७६ धावा या चौकार आणि षटकारांच्या होत्या.
* पंजाबची २२६ ही वानखेडेवरील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०११-१२ साली २०९ धावा फटकावल्या गेल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2014 6:29 am

Web Title: ipl 7 king of the punjab castle virender sehwag smashed a 58 ball 122 as kxip beat csk
टॅग : Ipl 7
Next Stories
1 काळी जादू!
2 फेडरर, जोकोव्हिचची आगेकूच
3 विश्वचषकासाठीची तीन स्टेडियम्स अजूनही अपूर्णावस्थेत
Just Now!
X