प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा स्पध्रेचा २०१७ मध्ये होणारा दहावा हंगाम परदेशात खेळवण्यास प्रशासकीय समिती उत्सुक आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
‘‘आयपीएल प्रशासकीय समिती भारतातील आणि परदेशातील सामन्यांच्या ठिकाणांचा अभ्यास करीत आहे. स्टेडियमची उपलब्धता आणि वातावरणाची अनुकूलता यांचा आढावा घेतल्यावरच योग्य निर्णय घेण्यात येईल,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.
निवडणुकीच्या कारणास्तव दोनदा आयपीएल परदेशात खेळवण्यात आली होती. २००९ मध्ये संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत झाला होता, तर २०१४ मध्ये पहिले १५ दिवस संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामने झाले होते.
लवकरच आयपीएल देशाबाहेर खेळवण्यात येईल, असे संकेत चार दिवसांपूर्वी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी ‘ट्विटर’द्वारे दिले होते.

धरमशाला येथे किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागपूरमधून सामने हलवण्यात आल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने आता धरमशाला येथे होणार आहेत. ‘‘किंग्ज इलेव्हन पंजाबचे तीन सामने धरमशाला येथे होणार असल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. अतिशय कमी कालावधीत या सामन्यांची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अत्यंत आभारी आहोत,’’ असे किंग्ज इलेव्हन पंजाबने म्हटले आहे. राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील १३ सामने हलवण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार १ मेनंतर महाराष्ट्रात एकही सामना होणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने जयपूरला तर पुण्याने विशाखापट्टणम्ला घरच्या सामन्यांसाठी परवानगी दिली आहे.