* भारताकडून आयसीसीला प्रतिनिधीत्व करायला मिळावे मागण्या मान्य झाल्यास कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनामा देण्यास तयार
बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या धमकीमुळे आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अखेर एन. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा त्याग करण्याचे मान्य केले खरे, पण त्यामध्येही आपली हटवादी भूमिका ठाम ठेवत तीन मागण्या ठेवलेल्या आहे. दरम्यान, राजीव शुक्ला यांनी आयपीएलच्या प्रमुखपदाचा राजीनमा दिल्याने श्रीनिवासन यांच्या चिंतेत अजूनच भर पडलेली आहे. रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन पदत्यागाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे श्रीनिवासन खरेच राजीनामा देणार का आणि राजीनामा दिल्यावर त्यांचे काय होणार ? हीच चर्चा सर्वत्र आहे.
राजीनामाच्या चारही बाजूंनी मागण्या होत असल्या तरी ते डगमगले नाहीत, उलटपक्षी प्रत्येकाचा त्यांनी समाचार घेतला, बीसीसीआयमधील दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला तरी त्यावर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, पण आता अजून काही बीसीसीआयचे पदाधिकारी राजीनाम्या देण्याच्या तयारीत असल्याने श्रीनिवासन यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अधिकाऱ्यांनी तुम्ही राजीनामा द्या नाही तर आम्ही राजीनामा देतो, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे श्रीनिवासन अडचणीत सापडले असून यामधून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधत आहेत.
येत्या २४ तासांमध्ये मोठी बातमी झळकेल, असा गर्भित इशारा बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली आणि संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर श्रीनिवासन बैठकीत राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.
एक दिवस थांबा, मोठी घडामोड तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा संयम बाळगा, भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी आम्ही काही पावले उचलणार आहोत. पोलिसांची या प्रकरणी कारवाई सुरू आहे, त्यामुळे आता थोडासा संयम बाळगणे गरजेचे आहे, असे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
शुक्रवारी श्रीनिवासन यांच्या हटवादी भूमिकेला कंटाळून सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. पण या गोष्टीचा कोणताच परिणाम श्रीनिवासन यांच्यावर झाला नाही. तरी त्यानंतर आपल्या विरोधकांची संख्या पाहून त्यांनी नमते घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीनिवासन यांचा र्कायकारिणी बैठकीलाही विरोध होता. पण आयसीसीने त्यांचा जावई गुरुनाथ मैयप्पनला सट्टेबाजीपासून दूर राहण्याची ताकीद दिल्याचे समजताच त्यांनी बैठकीला मंजूरी दिली.
बीसीसीआयच्या बैठकीची वेळ बदलली
एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने बैठक बोलावली असून या बैठकीची वेळ बदलण्यात आली आहे. सुरुवातीला ही बैठक सकाळी ११ वाजता होईल, असे सांगितले जात होते, पण काही तासांनी ही बैठक दुपारी २.३० मिनिटांनी होणार असल्याचे कळवण्यात आले. या बैठकीमध्ये श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी पदाधिकारी करणार असल्याचे चित्र आहे. बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक रविवारी, २ जूनला दुपारी २.३० मिनिटांनी चेन्नईतील पार्क शेरेटॉनमध्ये होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
राजीनामा देणार, पण..
चेन्नई : सहजासहजी राजीनामा देतील ते श्रीनिवासन कसले पण आता राजीनाम्याचा फास आवळला गेला असला तरी ‘मी राजीनामा देईन, पण माझ्या तीन मागण्या मान्य व्हायला हव्यात’ असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. रविवारच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत पदत्याग करण्याचा निर्णय श्रीनिवासन घेतील, अशी दाट शक्यता आहे.
श्रीनिवासन यांनी सर्व बाजूंनी विचार करत आपल्या तीन मागण्या केल्या आहेत. जर निर्दोष असेन तर अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात यावी, ही त्यांची पहिली मागणी आहे. तर शुक्रवारी राजीनामा देणारे सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांना नवीन कार्यकारिणीतून वगळण्यात यावे, ही त्यांची दुसरी मागणी असून भारताकडून आयसीसीला प्रतिनिधीत्व करायला मिळावे, ही त्यांनी तिसरी मागणी केली आहे.

बीसीसीआयमध्ये परतणार नाही -जगदाळे
‘मी भविष्यात पुन्हा कधीही बीसीसीआयमध्ये परतणार नाही. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा अथवा नये, हा माझ्या राजीनाम्याचा अर्थ होत नाही. तो माझा वैयक्तिक निर्णय होता. बीसीसीआयमध्ये परतण्याच्या शक्यतांचा मी विचारसुद्धा करत नाही. मी माझ्या कारकिर्दीत बरेच काही काम केले, असे मला वाटते. क्रिकेट या खेळाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ‘साफसफाई’ मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट या खेळाची प्रतिमा मलिन झाली आहे. मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार आहे. क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखणे कठीण असून बीसीसीआयला मर्यादा आहेत. पण बीसीसीआयने आपली भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा सक्षम करायला हवी. त्याचबरोबर स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळणाऱ्या क्रिकेटपटूंविरोधात कठोर कारवाई करायला हवी.

मोठे नाटय़ घडणार -जेटली
‘‘एक दिवस प्रतीक्षा करा. तुम्हाला नक्कीच काही तरी मोठे ऐकायला मिळेल,’’ असे जेटली यांनी सांगितले. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मैयप्पन अडकल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस दबाव वाढू लागला आहे. कोणत्याही दिवशी श्रीनिवासन आपला राजीनामा देतील, अशी परिस्थिती काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे दबावतंत्र अवलंबून निर्माण केली आहे.

स्पॉट फिक्सिंग लाजिरवाणे -निरंजन शाह
 हे संपूर्ण प्रकरण लाजिरवाणे आहे. मात्र यावर बोर्ड अध्यक्ष श्रीनिवासन यांचा राजीनामा हा उपाय नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी दडपण आणू नये.  हे प्रकरण लवकर विसरून जावे असे आहे. दिवसेंदिवस भयावह पद्धतीने परिस्थिती चिघळत आहे. श्रीनिवासन यांचा राजीनामा हा ते स्वत: आणि बोर्डाची नियमावली यांच्यातील मुद्दा आहे. संजय जगदाळे तसेच अजय शिर्के यांनी राजीनामे दिल्याने श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठीचे दडपण वाढले आहे. पोलीस चौकशी, न्यायालयीन चौकशी तसेच बोर्डाने नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे होणारी चौकशी यामध्ये कोणत्याही प्रतिकूल गोष्टीने बाधित होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. योग्य निर्णय येईपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे, दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईले. मात्र या प्रक्रियेत क्रिकेटमधील खेळभावना, चाहत्यांची निष्ठा, आवड यांना धक्का पोहचता कामा नये. या प्रकरणाने झालेली हानी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

चौकशी समितीच बरखास्त करा -मुथय्या
या चौकशी समितीची नेमणूक कुणी केली, ही समिती या प्रकरणातील सत्य तुमच्यासमोर आणेल का, असे प्रश्न मला सतावत आहेत. जगदाळे यांच्या राजीनाम्यामुळे ही समिती अडचणीत आली आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करण्यात यावी. बीसीसीआय हा खासगी क्लब आहे, असे दाखवण्यापेक्षा श्रीनिवासन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांच्यासमोर आता  पर्याय उरलेला नाही.

अंकितचे शुभमंगल ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच..
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाल्याने अंकित चव्हाणचे रविवारी होणारे लग्न होणार का? हा प्रश्न उपस्थित झाले होते. लग्नासाठी अंकितने कोर्टाकडे जामीन मागितला. कोर्टाने त्याची विनंती मान्य करत त्याला ६ जूनपर्यंत जामीन दिला. कोर्टाने विनंती मान्य केल्यामुळेच अंकितचे नेहा सांबरीशी ठरलेले शुभमंगल ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच होणार आहे. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक झाल्यानंतरही नेहाने अंकितची साथ सोडली नाही. आधी मैत्री आणि नंतर प्रेम असे नाते बदललेल्या नेहाने अंकित आणि त्याच्या घरच्यांचीच साथ देण्याचे ठरवले. आठ वर्षांच्या प्रेमाची रविवारी लग्नात परिणती होणार आहे.