भारतीय संघात स्थान मिळवल्यापासून फार कमी कालावधीत जसप्रीत बुमराहने संघातलं आपलं स्थान पक्क केलं. आपली भन्नाट गोलंदाजीची शैली आणि यॉर्कर चेंडू यामुळे बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. सुरुवातीला वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या बुमराहने कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करुन दाखवली. काही दिवसांपूर्वी बुमराहची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचं समोर आलं होतं. परंतू बीसीसीआयने यंदाच्या पुरस्कारासाठी रोहित शर्मा, इशांत शर्मा, शिखर धवन आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांच्या नावाची शिफारस केली.

बीसीसीआयने यात रोहित शर्माचं नाव हे खेलरत्न तर इशांत, शिखर आणि दिप्तीचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आलं. बीसीसीआयमधील काही अधिकारी बुमराहचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न केल्यामुळे नाराज असल्याचं कळतंय. बीसीसीआयमधील काही सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर Sportskeeda संकेतस्थळाशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. “जसप्रीत बुमराहचं नाव पुरस्कारासाठी द्यायचं नव्हतं तर मग त्याला अर्जुन पुरस्काराचा फॉर्म का भरायला लावला?? गेल्या ४ वर्षांच्या काळात बुमराहने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण आतापर्यंत त्याचं मोठ्या पातळीवर एकदाही कौतुक झालेलं नाही. इशांत आणि शिखर हे सिनीअर खेळाडू आहेत यात काहीच वाद नाही. पण केवळ सिनीअर खेळाडू आहेत म्हणून नावाची शिफारस करणं योग्य नाही. आपण पाठवलेल्या नावांचा पुढे सकारात्मक विचार केला जाईल याचाही अधिकाऱ्यांनी विचार करायला हवा.”

याआधीही बुमराहचं नाव चर्चेत होतं, परंतू ऐनवेळी इतर खेळाडूंसाठी त्याच्या नावावर फुली मारण्यात आल्याचं सूत्राने सांगितलं. आतापर्यंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बुमराहने आश्वासक कामगिरी केली आहे. सध्या करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद असल्यामुळे सर्व भारतीय खेळाडू घरी बसून आहेत. बीसीसीआय किंवा बुमराहने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.