करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. अखेरीस आयसीसीने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी क्रिकेट सामन्यांना परवानगी दिली. मात्र यासाठी प्रत्येक खेळाडूंना व संघांना काही नियम आखून दिले होते. विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ते स्वच्छतेबद्दलचे सर्व नियम आयसीसीने खेळाडूंना आखून दिले होते. तरीही इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान, जोफ्रा आर्चरने या नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं.

दुसरा कसोटी सामना सुरु होण्याआधी एक दिवस इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आर्चरने नियम मोडल्याचं समजलं. खबरदारीचा उपाय म्हणून आर्चरला दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आलं. घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्याला खेद असल्याचं म्हणत आर्चरने माफीही मागितली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आर्चरला आर्थिक दंड आणि ताकीद दिली आहे. दंडात आर्चरला किती रक्कम भरावी लागली हे मात्र समजू शकलेलं नाही. परंतू नियमांचा भंग करुन आर्चरने संपूर्ण मालिकेचं भवितव्य धोक्यात घातल्याची प्रतिक्रीया इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

अवश्य पाहा – संघातलं स्थान गमवावं लागण्याइतपत जोफ्रा आर्चरने केलं तरी काय??…