२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहली आणि बुमराह यांना मर्यादीत षटकांच्या सामन्यात विश्रांती दिली जाणार होती, मात्र कोहली आणि बुमराहला आता संपूर्ण विंडीज दौऱ्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या एक ते दीड वर्षाच्या काळात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना मोठ्या विश्रांतीची गरज असल्याचं निवड समितीचं मत पडलं आहे. भारतीय संघ आपल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अभियानाला वेस्ट इंडिजपासूनच सुरुवात करणार आहे.

अवश्य वाचा – संघातल्या तरुणांना धोनीच्या मार्गदर्शनाची गरज !

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचं प्रतिनिधीत्व करेल तर वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपद हे रोहित शर्माकडे जाईल. विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर अनेक सामने खेळायचे आहेत, या सामन्यांसाठी कोहली आणि बुमराह हे खेळाडू सज्ज असणं गरजेचं आहे. या कारणासाठी दोन्ही खेळाडूंना संपूर्ण विंडीज दौऱ्यात विश्रांती दिली जाऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. मात्र महेंद्रसिंह धोनीला विंडीज दौऱ्यात स्थान मिळणार की नाही याबद्दल अजुनही साशंकताच आहे.